पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/22

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अहंकारस्थळे. ज्याला नेमके अहंकारस्थळ हेरता येते आणि त्याबद्दल अंत:करणपूर्वक प्रशंसा करता येते तो पुरुषोत्तम कोणाही स्त्रीचे मन जिंकू शकतो. क्लिंटन यांची या क्षेत्रातील कर्तबगारी जगप्रसिद्धच आहे. राजस रूप, ओघवती भाषा, प्रभावी वक्तृत्व आणि कॅसानोव्हा तंत्र यांच्या मिलाफामुळे लेवेन्स्की प्रकरणाच्या ऐन चिखलफेकीतूनही ते सुखरूप सुटले. बांगला देश आणि भारतातील सर्व लोकांवर अशीच मोहिनी त्यांनी घातली. राजकारणात मोहिनीतंत्राचा वापर करणारा हा कोणी नुसताच Philanderer आहे की काय अशी संभावना डोकावते न डोकावते तोच क्लिंटन यांची पाकिस्तानयात्रा सुरू झाली. एअर फोर्स नं. १ ने जाण्याऐवजी साध्या विमानातून जाणे, त्यात पाकिस्तान फारशी सुरक्षित भूमी नसल्याचे सूचित करणे आणि नंतर, पाकिस्तानातील लष्करी हुकूमशाही, काश्मिरातील हस्तक्षेप आणि अणुबॉम्बच्या चाचण्या यांच्याबद्दल अगदी परखड शब्दांमध्ये दटावणे हे अगदीच वेगळे रूप एकदम समोर आले.
 श्रीकृष्णानेही सत्यभामा आणि रुख्मिणी. दोघींनाही समजावले. खरी बाजू कोणाची, खोटी कोणाची याचा निवाडा करण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. क्लिंटन यांची करामत त्यापलीकडची. भारतात प्रवास करताना त्यांनी मोहिनीतंत्राचा वापर केला आणि सायबराबादच्या भाषणात भारत जणू काही अमेरिकेच्या तोडीचा गणकतंत्रज्ञानी देश आहे अशी भलावण केली. जिकडे जावे तिकडे त्यांची स्तुती करावी या न्यायाने न वागता पाकिस्तानमध्ये खडीखडी सुनावली. या सर्व लीळा पाहता बिल विल्यम जेफर्सन क्लिंटन हा अनेक गुण आणि कौशल्याने विनटलेला महापुरुष आहे हे स्पष्ट होते. अमेरिकेतील निवडणुका जवळ आल्या आहेत. क्लिंटन यांचे वारसदार निदान क्लिंटन यांच्या इतक्या बहुविध गुणांनी संपन्न असतील, तरच सध्याच्या युगातील एकधुरी तंत्रज्ञानावर झेपावत असलेल्या जगाला काही आशा बाळगता येईल.

दि. ३०/४/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / २४