पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/259

हे पान प्रमाणित केलेले आहे.



केल्याने होत आहे रे


 १९८० मध्ये शेतीच्या प्रश्नाच्या अभ्यासाची माझी तपस्या सुरू झाली. ज्या प्रश्नाला अगदी सुरुवातीला हात लावला त्याला या महिन्यात अनपेक्षित यश मिळाले त्या आनंदात मी हे लिहीत आहे.
 गुजराथमधील भुज जिल्ह्यात नखत्राना तालुक्यात शेतकऱ्यांनी खवटपणाचा अंशही नसलेले भुईमुगाचे बियाणे तयार केले. त्याच्या गुणवत्तेबद्दल सर्वोत्तम प्रयोगशाळांनीही प्रमाणपत्रे दिली आहेत. या प्रयोगाच्या काळातच प्रचंड भूकंप झाला. पण, शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने आणि चिकाटीने काम चालू ठेवले, त्याला डॉ. बसू यांचे मार्गदर्शन लाभले आणि तयार झालेल्या भुईमुगात आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा ९० टक्के कमी खवटपणा आढळला.
 आपण ज्याला खवट दाणा म्हणतो त्यात अफ्लाटॉक्सिन् नावाचे विष असते. शंकर हलाहल प्याला तसे भारतीय हे विष पिढ्यान्पिढ्या पचवून बसले आहेत. पण, इतर देशांत या खवटपणाने पोटाचे, यकृताचे कॅन्सर होतात असे निःसंशय निदान झाले आहे. भुईमुगाच्या उन्हाळा पिकात या विषाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. खरीप आणि रब्बी हंगामांतमात्र भारतीय भुईमुगात हे विष आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा ५ ते १० पट जास्त असते. त्यामुळे, त्या भुईमुगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणे दुरापास्त झाले आहे.

 मी जेथे शेती सुरू केली त्या आंबेठाण गावाच्या परिसरात भुईमूग हे एक प्रमुख पीक आहे; कांदा हे दुसरे. त्यामुळे, चाकणच्या आसपास तेलाच्या गिरण्या अनेक वर्षांपासून उभ्या आहेत. भुईमुगाला भाव नाही हा प्रश्न तेथील शेतकऱ्यांना मोठा भेडसावीत होता. किर्लोस्कर ट्रॅक्टरच्या कामाच्या संबंधाने मी अल्जेरियात गेलो होतो. तेथून परतताना जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेलो. त्या देशात ग्राहक भांडारांची अनेक जाळी आहेत. त्यांपैकी

अन्वयार्थ – दोन / २६१