पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/43

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिले, की त्याला आणखी ४.५० कोटी डॉलर्सचे भांडवल मिळाले आहे. माझा अमेरिकेतील भाऊ हिंदुस्थानात वस्त्रोद्योग क्षेत्रातील इंजिनीअर होता. मी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्वित्झर्लण्डमधील नोकरीला रामराम ठोकून हिंदुस्थानात परत आलो त्याच सुमारास तो अमेरिकेत गेला. तेथे गेल्यानंतर त्याला अनेक आपत्तींना आणि व्याधींना तोंड द्यावे लागले. त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे ठरले. दहा वर्षे तो डायलिसिसवर राहिला. त्यानंतर, म्हणजे दहा वर्षांपूर्वी एका मृत व्यक्तीच्या मूत्रपिंडांचे आरोपण करण्यात आले. औषधांचा प्रचंड मारा झाल्यामुळे कदाचित्, इतर व्याधी उपटल्या. हृदयावरही शस्त्रक्रिया झाली. इतक्या व्याधींच्या आपत्तींनी हिंदुस्थानात कोणीही पार हतबल, निराश झाला असता. त्याची नियमित आणि कसोशीने देखभाल करण्यात माझ्या धाकट्या वहिनीने जे काम केले त्याबद्दल तिची गणना प्रातःस्मरणीय सतींमध्येच करायला पाहिजे. एवढ्या धामधुमीत, अमेरिकेमध्ये वस्त्रोद्योग अभियांत्रिकीला फारसा वाव नाही हे लक्षात येताच माझ्या भावाने गणकयंत्राचा अभ्यास केला. त्या क्षेत्रातही तो झपाट्याने वर चढला. आज तो IBM या विश्वविख्यात कंपनीच्या आशिया खंडातील विकास प्रकल्प विभागाचा प्रमुख आहे. आठवडाभर आज हाँगकाँग, उद्या चीन अशी त्याची भ्रमंती चालू असते. आठवड्यातून एकदोन दिवस, आताकांतारापेक्षा भयाण झालेल्या घरी परतल्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बागकाम, घरातील दुरुस्त्या, भारतीय संगीताच्या मैफली, नाटकांचे प्रयोग यांत तो गढून गेलेला असतो. स्थानिक समाजातील तरुण मुलांकरिता तो फूटबॉलचा एक संघही चालवितो.
 अनिवासी भारतीयांनी अमेरिकेत केलेल्या दिग्विजयाच्या कथा घरोघर ऐकायला मिळतात. गेल्या वर्षभरात अमेरिकेतील TIME साप्ताहिकाने या विषयावर दोन खास अंक काढले आणि शेकडो कर्तबगार भारतीयांची नावे जगासमोर आणली. मातृभूमीत बुद्धीला वाव मिळत नाही म्हणून अमेरिकेत निर्वासित झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषक जिंकण्याचा विक्रम वारंवार केला आहे. हर गोविंद खुराणा हे एक उदाहरण; अर्थशास्त्रात अमर्त्य सेन हे अगदी अलीकडचे उदाहरण.
 निराद चौधरी इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले बंगाली; जागतिक कीर्तीचे लेखक. त्यांना अनेकजण शेवटचा खराखुरा इंग्रज म्हणतात. भारतातील परिस्थितीबद्दल त्यांनी विपुल लिखाण केले आहे. भारतवर्षाला त्यांनी ग्रीक पुराणातील Continent of Circ सिर्क खंड ची उपमा दिली आहे. या खंडात जो जो प्रवेश करेल त्याचे

अन्वयार्थ – दोन / ४५