पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/48

हे पान प्रमाणित केलेले आहे.

निकालही चांगले लागत, शिक्षकांना कमाईही घवघवीत होत असे. आताचे शिकवणीचे वर्ग असे 'हातभट्टी' स्वरूपाचे नाहीत. प्रचंड आधुनिक दारूच्या कारखान्यांप्रमाणे ते सर्वदूर पसरले आहेत. काही शिकवणीवर्गांचे कार्यक्षेत्र विद्यापीठांपेक्षाही काही अंशी अधिक विस्तृत आणि व्यापक आहे. अशा शिकवणीच्या वर्गांची वार्षिक फी दरडोई पन्नास हजार रुपयांवर असते. काही वर्गांत प्रश्नपत्रिका फोडून आधी पुरविण्याचा मोबदला फीतच धरला जातो, काही ठिकाणी त्याची रक्कम वेगळी द्यावी लागते असेही ऐकायला मिळते.
 क्रिकेटचे खेळाडू हा लोकांच्या कौतुकाचा विषय आहे. आधुनिक काळात तपस्या, व्यासंग, धैर्य यांचे आदर्श राहिले नाहीत. त्यांची जागा क्रिकेटपटूंनी घेतली आहे. आमच्या लहानपणी क्रिकेट हे काही चरितार्थाचे साधन नव्हते. सारखा क्रिकेट खेळशील तर काय भीक मागून पोट भरशील? असे घरोघरी आया कोकलत असत. आता क्रिकेट हा गडगंज पैसे मिळविण्याचा मार्ग झाला आहे. खेळसामानाचे कारखानदारच फक्त नव्हे तर, टूथपेस्ट आणि शक्तिवर्धकांचे कारखानदारही लक्षावधीने रुपये खेळाडूंना देऊ करतात. हे बरीच वर्षे सर्वांना माहीत आहे. पण, मैदानावर सामने कसोशीने चालतात; कोणती बाजू जयपराजयाच्या लाटांवर वरखाली होईल तसतसे कोट्यवधी लोकांच्या जिवाची घालमेल होत असते; आपल्या देशाचा संघ जिंकला म्हणजे लोक हर्षोन्मादाने नाचतात आणि हरला म्हणजे ओक्साबोक्शी रडतात असा हा गंभीर आणि पवित्र विषय आहे.
 यात खेळाडूच सट्टेबाजी करीत असतील आणि पैसे घेऊन मॅच हरत असतील अशी शंकाही कधी कोणाच्या मनाला शिवली नव्हती. एका दिवसात हा आदर्शाचा डोलारा कोसळला आणि या भ्रष्टाचारात हात नसलेला कोणी क्रिकेट हीरो असेल असा लोकांचा विश्वास आता दुरापास्त झाला आहे.
 चाटे प्रकरणामुळे पवित्रतेचे आणखी एक मंदिर ढासळू लागले आहे.

 मॅट्रिकची परीक्षा विद्यापीठ घेत असे तेव्हापासून आणि शालांत परीक्षांची ही मंडळे सुरू झाल्यानंतरही बराच काळ परीक्षेचा निकाल सहा जून रोजी म्हणजे सहा जून रोजीच लागत असे; त्या दिवसाचेच पावित्र्य मानले जात होते. पहिल्या दहा विद्यार्थ्यांची नावे जाहीर होत, त्या यादीत आपले नाव झळकावे ही साऱ्या मेधावी विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा नव्हे, स्वप्न असे. भारताचे माजी वित्तमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी त्या काळी एकूण ७०० पैकी ६०० वर गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला होता. त्यानंतर हा उच्चांक मोडणे जवळजवळ

अन्वयार्थ – दोन / ५०