पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/49

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशक्य मानले जात असे. मॅट्रिकला पहिला येणारा विद्यार्थी असणे आणि जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती मिळविणे म्हणजे पुरुषार्थाची पराकाष्ठा मानली जाई.
 हळूहळू या निकालात पॅटर्न येऊ लागले. एकेका विद्यालयाचे किंवा जिल्ह्याचे दहादहा, वीसवीस विद्यार्थी गुणवत्तायादीत झळकू लागले. शिकवण्यांचे बहुतेक सारे वर्ग तर सारे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आपल्याच क्लासचे विद्यार्थी असल्याचा दावा मांडू लागले. लोकांच्या मनांत शंका येऊ लागली आहे. पहिला आलेला विद्यार्थी आणि त्याचे पालक यांनी शिकवणीवर्गाला श्रेय द्यावे यासाठी काही हजारांलाखांची देवघेव होत असेल, तर शिकवणीवर्गातीलच विद्यार्थी पहिलादुसरा यावा याकरिता अशीच देवघेव होत नसेल कशावरून?
 शालान्त परीक्षेनंतर व्यावसायिक शिक्षणाच्या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी आठदहा लाख रुपये द्यावे लागतात, त्यापेक्षा लाख दोन लाख रुपये देऊन मुळातच परीक्षेतील गुण वाढवून घेतले तर सौदा अधिक स्वस्त पडतो!
 विषय गंभीर आहे. आरोप उथळपणे करणे योग्य नाही. गेली काही वर्षे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी मी पाहिले आहेत. त्यांच्या यशाचे रहस्य त्यांची बुद्धी आणि कष्ट यांपेक्षा त्यांच्या पालकांच्या जवळील काळ्या पैशात आहे असे मला बऱ्याच वेळा वाटे. कोणी तक्रार नोंदविली नसेल; पण अमक्या अमक्या डॉक्टरने पैसे भरून आपला मुलगा पहिला आणवला अशी चर्चा, खालच्या आवाजात का होईना, सर्वदूर चालू आहे. क्रिकेटच्या सामन्यांचे निर्णय फिरविण्याकरिता कोटींची देवघेव होत असेल तर शालान्त परीक्षांचे निकाल फिरविण्याकरिता लाखांची देवघेव होत नसेल तरच ते अद्भुत म्हणावे लागेल!
 चाटे-देशमुख वादंगातून आणखी एक मुद्दा चर्चेला येत आहे. चाटेविरोधी गटाची माणसे हे सारे शिकवणीचे वर्ग बंदच करून टाकावे आणि शिक्षणक्षेत्रातील या 'हातभट्ट्या' संपवून टाकाव्या असे मांडू लागले आहेत.

 तसे पाहिले तर शिकवण्यांचे वर्ग हा सगळा खासगी मामला आहे. कागदोपत्री पाहिले तर शालान्त परीक्षांचे उमेदवार कोण्या सरकारी मान्यताप्राप्त विद्यालयाचे विद्यार्थी असतात. परीक्षेस बसण्यासाठी ते फॉर्म भरतात ते त्यांच्या विद्यालयांमार्फत; पण ही विद्यालये अभ्यासाची केंद्रे नाहीत. तेथे प्रवेशाचा धांगडधिंगाच गणपती येईपर्यन्त चालतो. मग गणपती, नवरात्र, दांडिया हे धुडगूस संपता संपता सहामाही परीक्षा आणि दिवाळी येऊन ठेपते. जे काही थोडे दिवस विद्यालये भरतात, त्यात निवडणुका आदी कार्यक्रम होतात. सरकारी मान्यताप्राप्त अधिकृत

अन्वयार्थ – दोन / ५१