पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/5

हे पान प्रमाणित केलेले आहे.





प्रास्ताविक


 १९७८ मध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाने वेगवेगळ्या साधनांचे प्रयोग केले. महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसा आणि सत्याग्रह या साधनांबरोबरच शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमध्ये एका आर्थिक हत्याराचीही जोड देण्यात आली. शेतकऱ्याने पिकविलेला माल रोखून धरला, बाजारात नेला नाही; तरच त्याला आपल्या मागण्यांकडे लोकांचे लक्ष वेधून घेता येते. हे लक्षात घेता, आंदोलन करताना ज्या मालाच्या भावाकरिता आंदोलन करायचे त्या मालाची निवड मोठ्या काळजीपूर्वक करण्यात आली. देशातील एकूण कांदाउत्पादनापैकी महाराष्ट्रात ४० टक्के कांदा तयार होतो. त्यापैकी ४० टक्के कांदा केवळ नाशिक आणि पुणे या दोनच जिल्ह्यांत तयार होतो. शेतकरी संघटनेची स्थापना पुणे जिल्ह्यात चाकण येथे झाली. चाकण हे कांद्याच्या बाजारपेठेचे महत्त्वाचे केंद्र आहे. नाशिक भागामध्ये तसे संघटनेचे काही काम नसताना, किंबहुना संघटनेची स्थापनाही तेथे झाली नसताना केवळ चाकण येथील बाजारपेठेच्या आधाराने आंदोलन सुरू करण्यात आले.
 यापुढील आंदोलन उसाचे झाले. उसाबद्दलही अशीच परिस्थिती. देशातील साखरेच्या एकूण उत्पादनापैकी ४० टक्के साखर महाराष्ट्रात तयार होते. त्यापैकी साखर उत्पादन करणारे महत्त्वाचे जिल्हे म्हणजे नाशिक, नगर, कोल्हापूर आणि सांगली. नाशिक भागात १९७९-८० मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना झाली. नाशिक जिल्ह्यातील सहकारी साखर उद्योगातील काही नेत्यांचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळाला. तेवढ्या आधारावर १९८० सालचे प्रख्यात ऊस आंदोलन झाले आणि ते यशस्वीही झाले.

 याबरोबर, नवनवीन कल्पना काढून सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा जसजसा प्रयत्न केला, तसतशी आंदोलनाची नवी हत्यारे तयार करावी लागली. मला स्वतःला, जेथे आंदोलन जाहीर होईल तेथे जिल्हाबंदी असे होऊ लागल्याने

पाच