पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/57

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बडदे, चंद्रकांत वानखेडे हे शेतकरी संघटनेचे बिनीचे कार्यकर्ते आणीबाणीच्या संपूर्ण काळात तुरुंगात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा ज्ञानप्रबोधिनी यांची पार्श्वभूमी असलेले विनय हर्डीकर,राम डिंबळे अशा कार्यकर्त्यांनीही आणीबाणीच्या काळात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम केले.
 आणीबाणीचा कालखंड संपला. इंदिरा गांधी गेल्या, परत आल्या, परत गेल्या. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले नेते आज शासनात अधिकारपदी आहेत. देशातील आजची परिस्थिती ही अनेक बाबतींत आणीबाणीपूर्व परिस्थितीसारखीच आहे. सरकारला बहुमताची खात्री नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बिहार, गुजराथ यांसारख्या राज्यांत बेबंद अंदाधुंदीच माजली आहे. एक कारगील आटोपले, पण आणखी दोनतीन 'कारगिल' प्रकरणांना लवकरच तोंड द्यावे लागेल असे दिसते आहे. अतिरेक्यांकडून घातपात, बॉम्बस्फोट, खून सर्रास घडत आहेत.
 इंदिरा गांधींनी 'मिसा' लावला तो बेबंदशाहीच्या परिस्थितीत, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्याविरुद्ध गेला म्हणून. आजही केंद्र शासन नवीन घातपातविरोधी कायदा संसदेपुढे आणीत आहे. हा कायदा 'मिसा'ची वाढवून बिघडविलेली आवृत्ती आहे. यात कोणालाही केवळ संशयावरून पकडण्याची तरतूद आहे, जामिनाचा हक्क काढून घेतला आहे आणि न्यायालयाकडे धाव घेण्यावरही निर्बन्ध असणार आहेत. इंदिरा गांधींनी 'मिसा'चा गैरवापर केला तसा आम्ही करणार नाही अशी सध्याच्या राज्यकार्त्यांनी कितीही ग्वाही दिली तरी ती निरर्थक आहे. सुलतानी कायदे तयार झाले, की त्यांचा वापर जितका अमानुष होणे शक्य आहे तितका होतोच. पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या विरुद्ध केलेल्या तरतुदींचा जाच सामान्य लोकांना किती भयंकर झाला हे अगदी अलीकडचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. शासनातील कोणा प्रमुख नेत्यास बाबरी मस्जिद प्रकरणी कारावासाची शिक्षा झाली तर दुसऱ्या आणीबाणीची घोषणा होण्यासाठी सारी काही तयारी सज्ज आहे.

दि. ७/६/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ५९