पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/81

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सत्ता मिळवली तर त्यात काही गैरवाजवी घडले असे भारतीयांना वाटत नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या मंत्रिमंडळ-समित्यांत शेती, तंत्रज्ञान, संगणक इत्यादी क्षेत्रांत भारतीय नागरिक महत्त्वाची स्थाने मिळवून आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी सर्व दृष्टीने राष्ट्राध्यक्ष होण्यास पात्र आहेत; पण स्त्री असल्यामुळे केवळ, त्या कधीकाळी स्वतःच राष्ट्राध्यक्ष बनतील असा विचार करणेही कठीण आहे. अर्थात्, कोणी अनिवासी भारतीय या शतकाततरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनेल ही शक्यता नाही; पण कित्येक वर्षांपूर्वी मळ्यांवर मजूर म्हणून कंत्राटाने गेलेले भारतीय नागरिक अनेक देशांत स्थायिक झाले आहेत. त्यांचे वंशज आज मानमरातब, धनसंपत्ती एवढेच नव्हे तर राजकीय सत्ताही बाळगून आहेत. मॉरिशसचा पंतप्रधान भारतीय असण्याचे आता काही फारसे कौतुक राहिलेले नाही. इंडोनेशिया, कंबोडिया हे देश तर, कदाचित् पुरातन हिंदू संस्कृतीचे उगमस्थान. तेथील राजकारणाच्या प्रकाशझोतात येणाऱ्या व्यक्तींची नावे संस्कृतप्रचुर आणि अनेकदा ओळखी ओळखीची वाटतात.
 फिजी बेटातही भारतीय मुळाचे पंतप्रधान झाले ते सहजासहजी नाही. फिजी बेटसमूहातील बहुसंख्य प्रजा तद्देशीय आदिवासींची. साम्राज्यवादाच्या सुवर्णस्पर्शाने ही बेटे आधुनिक युगात प्रवेश करती झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी असलेल्या व्यापारी संबंधांनी बऱ्यापैकी सुबत्ता आली. या व्यापाराची सारी सूत्रे मूळचे भारतीय असलेल्या व्यापारी समाजाकडे. अशा या परिस्थितीत, राजकारण मोठे ताणतणावाचे असणार हे उघड आहे. दोन विभक्त जमातींच्या राष्ट्राला एकसंध कसे राखावे हा प्रश्न गांधी-जीनांना सोडवता आला नाही, तो महासागरात विखुरलेल्या बेटांच्या या समूहराष्ट्राने सोडवून दाखविला. अल्पसंख्य जमातीचे श्री. चौधरी पंतप्रधान म्हणून निवडून आले, हे तेथील खऱ्याखुऱ्या लोकशाहीचे प्रमाणपत्रच आहे.
 या सगळ्या ऐतिहासिक कामगिरीला डाग लावला तो आदिवासी समाजातील, व्यापारउदीमात प्रवेश करून भरभराट साधण्याच्या प्रयत्नांत अयशस्वी झालेल्या एका माणसाने. पाचपंचवीस बंदूकधारी माणसांना घेऊन जॉर्ज स्पाईट लोकसभागृहातच घुसला आणि पंतप्रधान चौधरी यांच्यासकट अनेक महत्त्वाचे नेते त्याने ओलीस धरले. मोठा घटनात्मक पेचप्रसंग तयार झाला. त्याच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने आणि दूरदर्शनची वार्तापत्रे भरून वाहत होती.

 आतंकवाद्यांचा प्रश्न भारताला काही अनोखा नाही. एकट्यादुकट्या व्यक्तींचे

अन्वयार्थ – दोन / ८३