पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/82

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खून करणे, गाववस्त्यांवर हल्ले करून मुडदे पाडणे, प्रवासी गाड्या थांबवून निवडक प्रवाशांना खाली उतरवून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करणे हे प्रकार अनेक भागांत- पंजाब, आसाम, कश्मीर इत्यादी – दैनंदिन घडत असतात. पण, कोणी खासगी सेना, हत्यारे घेऊन पंतप्रधानांवरच ताबा मिळवेल, त्यांना ओलीस ठेवून देशाची घटनाच बदलण्याचा खेळ खेळू शकेल हे काही संभाव्य दिसत नाही. फिजीसंबंधीच्या बातम्या पाहताना, ऐकताना सर्वांच्या मनात प्रश्न उभा राहत असे, या देशातील लष्कर काय करते आहे? फिजीमधील समस्या तेथील परंपरेप्रमाणे सुटू पाहत आहे; पण, असले अचरट प्रकार हिंदुस्थानात घडूच शकणार नाहीत असे ज्यांना वाटत होते त्यांना मात्र वीरप्पन-राजकुमार प्रकरणाने सपशेल तोंडघशी पाडले आहे.
 वीरप्पन हा चंदनाची तस्करी करणारा प्रख्यात दरोडेखोर. तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्या सरहद्दीवरील शेकडो एकर घनदाट जंगल हा त्याच्या अधिसत्तेचा प्रदेश. कित्येक वर्षे झाली, तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सरकारांनी कोट्यवधी रुपये खर्च केले; पण, वीरप्पन त्यांच्या हाती लागू शकलेला नाही. वीरप्पन श्रीलंकेतील तामिळी वाघांना सामील आहे असे कर्नाटकात सर्रास मानले जाते. त्याचा शेकडो चौरस मैलांचा जंगलप्रदेश तामीळी वाघांकरिता लपण्याचे, विश्रांतीचे, प्रशिक्षणाचे स्थान आहे. श्रीलंकेला यादवी युद्ध जिंकायचे असेल तर वीरप्पनच्या जंगलप्रदेशावर त्यांना बॉम्बहल्ला करावा लागेल.

 राजीव गांधी यांच्या खुनाच्या कारस्थानात असलेले अनेकजण या जंगलात आश्रय घेऊन आहेत असे बंगलोरच्या रस्त्यांत उघड बोलले जात असतानासुद्धा कोणत्याही पोलिसदलाची तेथे धाड घालण्याची हिंमत झाली नाही. वीरप्पन म्हणजे काही व्यापारउदीमात दिवाळखोरीला आलेला जॉर्ज स्पाईट नव्हे. राजकुमार हा काही मुख्यमंत्री नाही; पंतप्रधानतर नाहीच नाही. पण, कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांतील सिनेरसिकांच्या हृदयांचा तो बादशहा आहे. दक्षिणेतील नटनट्यांची लोकप्रियता हा काहीएक अजबच प्रकार आहे. महाराष्ट्रात दादा कोंडकेच काय, निळू फुलेदेखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल अशी कल्पना करणे कठीणच; मग चंद्रकांत आणि अशोक सराफ यांची गोष्ट दूरच राहिली; पण, दक्षिणेत हे सहज शक्य होते. एन. टी. रामाराव तेलगू सम्मानची घोषणा करून नऊ महिन्यांच्या अवधीत मुख्यमंत्री झाले. जयललिता अगदी अलीकडेपर्यन्त दिल्लीचे सरकार पाडण्याची ताकद आणि हिंमत ठेवून होती. तेव्हा राजकुमार यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नसली तरच आश्चर्य. गेली काही वर्षे मधूनमधून, राजकुमार राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झळकतात; कधी तो काँग्रेसमध्ये जाणार अशी आवई उठते, तर कधी तो

अन्वयार्थ – दोन / ८४