पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/99

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंस्र पशू यांच्यात व्हायचा किंवा दोन शस्त्रसज्ज कुस्तीगिरांची झुंज असायची. सामन्याच्या शेवटी एकच पक्ष सहीसलामत बाहेर पडणार आणि दुसरा मैदानातच देह टाकणार याची जवळजवळ खात्रीच असायची. एक कुस्तीगीर हरू लागला म्हणजे प्रेक्षक हलकल्लोळ करून जिंकणाऱ्या कुस्तीगिरास प्रतिस्पर्ध्यास संपवून टाकण्याकरिता, आरडाओरड करून आग्रह करीत. रोमन खेळात सौहार्दपूर्ण शेवटाची शक्यताच नव्हती.
 ग्रीक पद्धतीच्या खेळामध्ये महत्त्व कामगिरीला होते, जिंकण्याहरण्याला नव्हते.
 भारत खंडातील प्रेक्षकांची मानसिकता रोमन परंपरेशी अधिक जुळणारी आहे. समोरासमोर ईर्ष्येने संघर्ष करणे त्यांना समजते; जिंको किंवा हरो. अधिकाधिक कोशीश करून उच्चांकांवर उच्चांक गाठणे त्यांच्या प्रकृतीस फारसे जमत नाही.
 ग्रीक परंपरेतील अलीकडच्या काळातील सत्ताविसावे ऑलिम्पिक खेळ सिडनी येथे चालू झाले आहेत. साऱ्या जगभरातील यौवनश्रींचा हा महोत्सव. मानवी शरीर जे जे काही करू शकेल त्याची अद्भूत प्रात्यक्षिके जगापुढे मांडण्यासाठी हजारो युवकयुवती जमा होतात. एक खर्व जनसंख्येच्या आपल्या खंडप्राय देशाला एखादे सुवर्णपदकदेखील मिळण्याची शक्यता दिसत नाही; एखादे मिळालेच तर धन्य धन्य वाटते. आरामखुर्चीपंडितांची सहजस्फूर्त टिप्पणी - जातात कशाला कुणाला ठाऊक? विदेश पर्यटनाची संधी साधतात खेळाच्या नावाने, खेळाडू आणि पुढारी. याच्या दुसऱ्या टोकाची प्रतिक्रिया - लहानपणापासून होतकरू मुलांना वेगळे काढून, कसोशीने सराव देऊन त्यांना खेळासाठी तयार केले पाहिजे. ऑलिम्पिक खेळांच्या निमित्ताने आपला देश, आपला वंश यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न ज्या ज्या हिटलरांनी केला त्यांची त्यांची फजिती झाली. ज्या देशात सर्वच प्रकारच्या संधी जनसामान्यांनादेखील मुबलकतेने उपलब्ध असतात तेथील खेळाडू अधिकाधिक उंच, अधिकाधिक दूर, अधिकाधिक जलद ध्येय साधतात. रशिया, पूर्व जर्मनी आजपर्यंतच्या खेळात अग्रणी असत. या वेळी त्यांची परिस्थिती मोठी केविलवाणी झालेली दिसते.

 ऑलिम्पिक खेळांच्या बाबतीत जे खरे, तेच जागतिक व्यापाराबद्दलही लागू आहे. जागतिक व्यापार म्हणजे अधिकाधिक चांगला माल अधिकाधिक स्वस्त उत्पन्न करून बाजारपेठा जिंकण्याची स्पर्धा आहे. आम्ही फार कच्चे; आम्ही काय परदेशातल्या मालाशी स्पर्धा करणार? नकोच आम्हाला ती जागतिक

अन्वयार्थ – दोन / १०१