या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


१०० । अभिवादन



ग्वाल्हेर यांची मिश्रणे लोकप्रिय झाली. गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे यांनी दिलेले संगीतच क्रमाने खाडिलकर-गडकऱ्यांच्या नाटकांत होते. या दोहोंच्या मध्ये तप, दीड तप कोल्हटकर उभे होते, कोल्हटकरांचे तानप्रधान संगीत उभे होते. कोल्हटकरांनी उर्दू आणि पारशी रंगभूमीवरील ज्या चाली मराठी रंगभूमीवर आणल्या, त्यात तानांची कसरत होती, गतिमानता होती, राग-रागिण्यांची मिश्रणे होती. पण या सर्व संगीताचा संगीत म्हणून दर्जा फार सामान्य होता. संगीतक्षेत्रातल्या मंडळींनी या संगीताची आकर्षकता मान्य केल्यानंतर त्याचा दर्जा सामान्य ठरविला आहे. गोविंदराव टेंबे त्याला रंगीबेरंगी तुकड्यांचा मजेदार ताबूत म्हणतात. त्यांनीही या संगीताला दर्जा नव्हता, असेच मत दिलेले आहे. बाबूराव जोशींनी या संगीताविषयी दर्जा म्हणून नापसंतीच दाखविली आहे. संगीताच्या क्षेत्रातही कोल्हटकरांना चमत्कृती आणि नावीन्य यांचा मोह पडला. त्या संगीतातील स्थायी माधुर्याचे गुण त्यांनी दुर्लक्षित केले.
 किर्लोस्करांचे संगीत जसेच्या तसे शिल्लक राहणारच नव्हते. सगळ्या महाराष्ट्रातच संगीताचे पुनरुज्जीवन चालू होते. अभिजात संगीताच्या आकर्षणाची एक नवीन लाट आलेली होती. तिचे पडसाद मराठी रंगभूमीवर उमटतच होते. किर्लोस्करांची नाटके तीच होती, गीते तीच होती, परंतु त्यांतील गायनाचे प्रकार मात्र क्रमाने बदलत होते. देवलांच्या नाटकांमधून किर्लोस्करी संगीतच होते. पण त्या संगीतातील काही घटक सदैव बदलत होते. विशेषतः देवलांच्या 'मृच्छकटिक ' आणि 'शारदा' या नाटकांतील संगीताचे स्वरूप निराळे होते. ते अगदीच 'सौभद्रचे ' चे संगीत नव्हते. कोल्हटकरांच्या वैभवाचा काळ जरी घेतला. -म्हणजे १८९६ ते १९१० हा काळ जरी विचारात घेतला, तरी 'सौभद्र' चालू होते, 'मृच्छकटिक ' आणि 'शारदे ' ला अपार लोकप्रियता होती. आपल्या वैभवाच्या काळातही कोल्हटकर मराठी रंगभूमी आच्छादून टाकू शकत नव्हते.
 तरीही मराठी वाङमयात कोल्हटकरांचे एक महत्त्व आहे. हरी नारायण आपटे यांच्यामुळे कादंबरीत आणि किर्लोस्कर- देवलांच्यामुळे नाटकात वास्तववादी शैली ही रूढ झालेली होती. या जिवंत, प्रसन्न वास्तववादी शैलीला जसे सामर्थ्य होते, तशा तिच्या मर्यादाही होत्या. कोल्हटकरांनी कोटया व कल्पनाविलासाने नटलेल्या नव्या आलंकारिक शैलीचा पुरस्कार केला. पाहता पाहता या नव्या आलंकारिक शैलीने वास्तववादी शैलीचा पाडाव केला. खांडेकर आणि माडखोलकर हे तर कोल्हटकरांचे शिष्यच आहेत. पण प्रत्यक्ष फडकेसुद्धा आलंकारिकाच्या शैलीत लिहीत असतात. फडक्यांची शैली वास्तवाचा भास निर्माण करणारी पण आलंकारिकांची शैली आहे. हा प्रश्न फक्त शैलीचा नसून मनोवृत्तीचाही आहे. नवनवे स्वप्नरंजन निर्माण करून त्या काल्पनिकाच्या पसायात