या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्राचार्य अनंत सदाशिव आठवले । १०७



आसक्तीपोटी जन्मभर ब्रह्मचारी राहणारा माणूस ह्या दोघांच्यामध्ये थोडासा फरक आहे. पण तत्त्वतः फारसा फरक नाही, असे मला वाटते. वर्षभर कळ सोसून साधना करावी म्हणजे इहलोकी पुढे पंचवीस वर्ष सर्व सुखे प्राप्त होतात, असे समजून वर्षभर साधना करणारा माणूस हा आपल्या जीवनात फार मोठी नैतिक कमाई करतो आहे, असे मला वाटत नाही. म्हणून इहलोकी आणि परलोकी जी कोणती फळे मिळण्याची शक्यता आहे त्या विषयाचे वैराग्य हा नुसता ब्रह्मजिज्ञासेचा आरंभ आहे असे मी मानीत नाही, तर तो सगळ्याच नैतिक प्रेरणेचा गाभा आहे, असे मी मानतो. अनंतरावांनी ह्या दिशेने खूप मोठा प्रवास करून साधनेचा एक मोठा टप्पा गाठला आहे, असे मला वाटते. म्हणून ते ब्रह्ममय झाले आहेत असे मी म्हणणार नाही. पण ह्या प्रवासात ते बऱ्याच पुढच्या मुक्कामावर जाऊन पोचले आहेत ह्याविषयी मात्र मी निःशंक आहे.
 अनंतराव आठवले ह्यांच्याविषयी असणाऱ्या माझ्या ममत्वाची अजून एक-दोन कारणे आहेत. त्यांचीही नोंद केली पाहिजे. अनंतराव ह्यांचा सतत चालू असणारा लेखन व अभ्यासाचा प्रपंच हे त्यांपैकी एक आहे. ह्या लेखनअभ्यासात ते सतत गढलेले असल्यामुळे त्यांच्या हातून नानाविध प्रकारची ग्रंथरचना झालेली आहे. हे सगळेच ग्रंथ मला आवडण्याजोगे नाहीत. जर कुणी माणूस सर्वसामान्य जनतेसाठी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी सोपी करून मांडू लागला तर ह्या धडपडीला काही अर्थ आहे, महत्त्वही आहे, असे मला वाटते. कारण सर्वसामान्य जनतेपर्यंत भक्तिमार्ग नेण्याची ही एक पद्धती आहे. सगुण भक्तीचा मार्ग ही एक जनतेची चळवळ आहे. ह्या आंदोलनात जनतेपर्यंत जाणे ह्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. भगवद्गीता हे त्यासाठी वापरले जाणारे भारतीयांचे एक फार मोठे साधन आहे. पण ब्रह्मसूत्र हा मात्र ह्या प्रकारचा ग्रंथ नाही. सर्वसामान्य जनतेला तत्त्वज्ञान सोपे करून सांगावे हा काही ब्रह्मसूत्राचा हेतू नव्हे. ब्रह्मसूत्राचा हेतू जे श्रूतिप्रामाण्य मानतात त्यांना, श्रूतींचा पाठिंबा ‘सचेतन कारणवादा ' ला आहे, अचेतन कारणवादाला नाही, हे पटवून देणे हा आहे.
 म्हणून ब्रह्मसूत्राचा वाचक हा उपनिषदे वाचणारा, उपनिषदांचे प्रामाण्य मानणारा आणि उपनिषदे कोणत्या तात्त्विक भूमिकेला पाठिंबा देतात यात रस असणारा असतो असे गृहीत धरावयाचे असते. सर्वसामान्य जनतेला ब्रह्मसूत्र सोपे करून समजावन सांगणे असा प्रयत्न जनतेसाठी निरर्थकच असतो. उलट या प्रयत्नात शास्त्रीय चर्चेतील रेखीवपणाच ओसरून जाण्याचा संभव असतो. आता जर अनंतराव आठवले सर्वसामान्य जनाला भक्तिमार्ग शिकवण्यासाठी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिड लागले तर हा उद्योग माझ्यासारख्याला आवडण्याजोगा नाही. कारण ब्रह्मसत्राच्या निमित्ताने जे वाद आहेत त्यांचा ऊहापोह तशा प्रकारच्या भाष्यात नसतो.