या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्राचार्य अनंत सदाशिव आठवले । ११३


असणारच. कारण ते नियोजन आणि वक्तशीरपणा. ह्या दोन्ही वैशिष्टयांशी बांधलेले गृहस्थ आहेत. भजन हे नियमित होणार, त्यात चूक नाही, हा जसा त्यांचा एक स्वभाव तसा सात मिनिटांऐवजी भजनाला आठवे मिनीट मिळणार नाही हाही त्यांच्या मनाचा एक भाग आहे. तेव्हा उरलेल्या आयुष्यात काय काय करायचे, किती दिवसांत, किती वेळात काय लिहायचे हे त्यांनी ठरविले असणारच. ते त्यांचे संकल्प निर्विघ्नपणे पार पडावेत अशीच आमची सद्भावना आहे. पण त्याबरोबरच युधिष्ठिरावर लिहिणे हीसुद्धा त्यांनी जबाबदारी समजावी अशी अपेक्षा आहे. हे घडायचे असेल तर यापुढे दीर्घकाळ त्यांना चांगले आयुरारोग्य व समाधान असावे हे गृहीतच आहे. ते त्यांना पांडुरंग देवो!