या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८ । अभिवादन

आहे. असाच प्रकार मुक्तेश्वरांच्या बाबतीतही आहे. मुळातील व्यासांच्या प्रतिभेचे मर्म आकलन करण्यात उभय मराठी कवी कसे अगदी थिटे पडतात हेही नांदापूरकर नोंदवीत जातात. पांडवांनी वारणावतप्रसंगी लाक्षागृहात कुणाचा तरी बळी देता यावा यासाठी पद्धतशीर ब्राह्मण-भोजने घातली व बळी जाण्यासाठी योग्य जीव सापडताच सहा जीव बळी देऊन ते खुशाल निसटून गेले हा व्यासांचा मुद्दा उभय मराठी कवीत वगळला गेला आहे, याबद्दल त्यांनी दोघांनाही दोष दिला आहे.
 अण्णांचा हा सारा अभ्यास मोठा रसिक, नि:पक्ष, समतोल आहे, हे गृहीत धरले तरी अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यांची उत्तरे या प्रबंधात दिलेली नाहीत. भारतीय कथानकात फेरफार करण्याचे स्वातंत्र्य आमचे मराठी कवी घेतात म्हणून त्यांची काव्ये स्वतंत्र आहेत हे सांगणाऱ्या अण्णांनीच अशा प्रकारची ढवळाढवळ, बहुधा मार्मिकता उणी करणारी आहे हे दाखवून देऊन उभय मराठी कवींचे तथाकथित स्वातंत्र्य किती बेगडी आहे हेही दाखविले आहे. यांपकी कुठली तरी एक बाजू घेतली पाहिजे. मोरोपंती कथानक मुक्तेश्वरांपेक्षा जास्त सुसंगत, जास्त प्रमाणबद्ध आहे, या दृष्टीने ते मुक्तेश्वरांपेक्षा श्रेष्ठ आहेत, हे सांगतानाच त्यांनी पंतांतील सदरहू गुणांचा उदय प्रामाणिक मूलानुसरणातून आहे हे दाखविल्यामुळे मोरोपंतांचे स्थान अनुवादक म्हणून नक्की करून टाकले आहे. शेवटी मूलानुसरण हाही एक गुण असल्यासारखे अण्णा जेव्हा वर्णू लागतात तेव्हा तर बराच विस्मय वाटतो. व्यासांना शिफारसपत्र देताना ते म्हणतात, दैवी परिवेष कथांना देण्याच्या मागचा हेतू त्या दीर्घजीवी करणे हा आहे. पण वस्तुस्थिती नेमकी याच्या उलट आहे. पुराणकथांतील पात्रे जेव्हा आदरविषय झाली त्या वेळी दैवी परिवेष देऊन मांत्रसंस्कृतीने प्राचीनांच्या न पटणाऱ्या कृत्यांचे समर्थन केले.सृष्टयुत्पत्ती आदी कथा त्याही काळी प्राचीनच होत्या असे अण्णा म्हणतात. वस्तुतः सृष्टयुत्पत्तीच्या कथांच्या मधील चौफेर अद्भुतता आरण्यककाळाच्या नंतर सतत वाढली आहे. महाभारतातील अनेकविध भागांवर जे अद्भुताचे आवरण आहे त्याचे कारण अतिप्राचीनता हे क्वचित असून बहूधा अर्वाचीनता हेच आहे. ज्या मुक्तेश्वरांनी कथानकरचनेत स्वातंत्र्य घेण्याचा अहर्निश प्रयत्न केला तो त्यांचा प्रयत्न फसला असेल, पण त्यामागील भूमिका स्वतंत्रप्रज्ञ कवीची आहे. मोरोपंतांत असा प्रयत्न मुक्तेश्वरांपेक्षा जास्त आणि सफळ दाखवल्याशिवाय कथानकरचनेत पंतांचे श्रेष्ठत्व मान्य करणे अडचणीचे होऊन बसते.
 मूळ महाभारतातील पाच पर्वांचे कथानक आणि त्यांतील उपकथानके नांदापूरकरांना बारकाईने नोंदवावी लागली आहेत. त्यामुळे महाभारताचे प्रामाणिक कथानक निदान पाच पर्वांपुरते तरी सर्व मर्मासह कळण्याची सोय झाली आहे. हा