या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४ । अभिवादन

श्वरांच्या डोळ्यांसमोर अशा सर्व प्रसंगी शरीराच्या क्रिया आणि पुत्रोत्पत्ती इतकेच असते. त्यांची सर्व पुरुष-पात्रे यांत्रिक परिभाषेत बोलतात. मुक्तेश्वरांचा पराशर मत्स्यगंधेला “ तुझ्या उदररूपी शेतात जर नांगरून बीजारोपण केले तर उत्कृष्ट पिकाला ही भूमी चांगली आहे,” असे म्हणतो. हा सारा शृंगार मानण्यात आपण कुठे चूक तर करीत नाही ? मुक्तेश्वर संत होते. कदाचित सामान्य मर्त्य जीवांची शृंगारविषयक वृत्ती त्यांना अगदीच अपरिचित असणे संभवनीय आहे. कथानकांत शृंगार तर वर्णावयाचा होता; स्वतःला तर त्याचे ज्ञान नाही; त्यामुळे यांत्रिक क्रिया जागजागी कल्पनाविलासाने नटवून त्यांनी रंगविल्या. त्यांत संयोगाच्या क्रिया-प्रक्रिया, मागण्या-विनवण्या इ. आहेत ; पण शृंगाररस आहे असे नाही. पशुपक्षीही संयोग घेतात. या संयोगासाठी त्यांना क्वचित अनुनय- बहुधा आक्रमण करावे लागते. हा शृंगार नव्हे. मुक्तेश्वरांच्या शृंगाराचा विचार करताना ही भमिका घेणे योग्य ठरेल काय, याविषयी मला खात्री नाही. पण हीही एक विचारार्ह बाजू आहे. मुक्तेश्वरांत आढळणाऱ्या चौफेर, सर्वव्यापी अश्लीलतेकडे यामुळे आपण अधिक स्वच्छपणे पाहू शकू. ही भूमिका जर घेतली तर कामार्णवाचे कल्लोळ अंतःकरणात उठलेला दुष्यंत अष्टविवाहाची चर्चा का करतो, याचेही उत्तर देता येईल. वनपर्वात अस्त्रविद्येसाठी स्वर्गी गेलेल्या अर्जुनाच्या मांडीवर उर्वशी येऊन बसते याचा उल्लेख अण्णांनी केला आहे. उर्वशी अचानक अंकारूढ होते त्यामुळे उर्वशी अगर अर्जुन या दोघांनाही आलंबनविभाव होता येत नाही. म्हणून मुक्तेश्वरांनी इंद्राच्या मुखी उर्वशी-संयोगाचे महत्त्व आणि सुख घातले आहे. अण्णांना हा सारा भाग चमत्कारिक वाटतो. त्यामुळे इंद्राला हीनत्व येते, असे त्यांना वाटते. मुक्तेश्वरांना तसे करण्यात संकोच का वाटला नसावा याचे कारण वर दिले आहे.
 आदिपर्वाच्या सतराव्या अध्यायात दानवीराचा उदात्त प्रसंग चालू असताना कर्ण इंद्राला आपले रूप विकृत होईल असे का म्हणतो आणि त्याच्या उत्तरी इंद्र अण्णांना अश्लील वाटणारे उत्तर का देतो ? अण्णांनी या प्रसंगामुळे झालेल्या दानवीराच्या अपकर्षाचे वर्णन केले आहे. मला वाटते, मुक्तेश्वरांना कर्णाची मागणी आणि इंद्राचे उत्तर ह्या दोन्ही बाबी 'रूटीन' वाटल्या, अश्लील वाटल्या नाहीत. वीररसाच्या सर्व वर्णनात अण्णांनी मुक्तेश्वरांना मल्लविद्या किती ज्ञात होती याचाही विचार केला आहे. सर्व विद्वानांनी याबाबतीत मुक्तेश्वरांची अफाट स्तुती केली आहे. मुळात मुक्तेश्वरांना फारशी मल्लविद्या अवगत नव्हती, हा अण्णांचा निष्कर्ष चिंतनीय आहे. मोरोपंतांनी युद्धप्रसंगी जो वीररसाचा खळाळ वाहविला आहे तो प्रबंधाच्या कक्षेबाहेर गेल्यामुळे या बाबतीत मोरोपंतांचे खरे वैभव प्रकटण्यास संधी मिळत नाही.