या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता । ५५


नद्यांचे वेगळेपण राहत नाही. सगळा समुद्रच होतो. ईश्वराशी एकजीव होणे ही खरी भक्ती आहे. ज्ञानेश्वरांच्या या भक्तिमार्गाचा परिणाम जाणूनबुजून असो अगर अनिच्छेने असो सामान्य जनतेला नवी प्रतिष्ठा देणारा ठरला.
 शेवटी गीतेकडे आपण एक ऐतिहासिक ग्रंथ म्हणूनच पाहणार. नव्या जीवनाच्या नव्या गरजा आणि त्यांची उत्तरे भगवद्गीतेत सापडण्याचा संभव फार कमी आहे. अल्लाउद्दीन खिलजी भारतात आला म्हणजे साऱ्या भारतीय जीवनाचा संदर्भच बदलतो. जुने कर चालू राहतात, नवे भारी कर उदयाला येतात. हे कर वसूल करणारी यंत्रणा अधिक बलवान, अधिक तत्पर आणि अधिक निर्पण करावी लागते. इंग्रज आले म्हणजे जीवनाचा संदर्भ पुन्हा बदलतो. नवीन आव्हाने जीवनात उदयास येऊ लागतात. आधुनिक जीवन विज्ञान आणि स्वातंत्र्य यावर आधारलेले आहे. या नव्या जीवनात अनन्यभक्तीला जागा नाही. विज्ञानाच्या जोरावर वास्तवाचे अचूक आकलन आणि मानवी सुखार्थ त्याचे उपयोजन आणि प्रत्येक माणूसमात्राच्या सर्व प्राथमिक गरजांची पूर्णता या कल्पनेवर आधुनिक जीवन आधारलेले आहे. सर्व मानवमात्राच्या मूलभूत प्राथमिक गरजांच्या उपशमावर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने उभे राहत असते. अशा या काळात धार्मिक कल्पना आणि त्यांची कल्पित वस्त्रे-प्रावरणे क्षणभर कल्पनेची पकड घेऊ शकतील, पण मूलभूत प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाहीत. दुर्गुणांचे मूळ प्राधान्याने सामाजिक असते. प्रमुखत्वे समाजरचना माणसाला सत्प्रवृत्त करते हे वैज्ञानिक सत्य मान्य केल्यानंतर 'विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी' अशा काव्यमय घोषणा करण्यात फारसा अर्थ नाही. विज्ञानाने आपल्या संशोधनाचा वापर करताना समाजहित नजरेआड करून चालणार नाही इतके म्हटले तरी चालण्याजोगे आहे. या नव्या युगाच्या उभारणीसाठी गीता आणि बायबलकडे जावे लागत नाही. हे ग्रंथ आता शुद्ध वाङमयीन आस्वादाचे विपय मानले पाहिजेत.
 प्रो. दामोदर कोसंवी यांनी भगवद्गीतेच्या निमित्ताने जे विचार मांडलेले आहेत, त्यांचा साररूपाने वर परिचय करून दिला आहे. हा परिचय करून देतानाच ठिकठिकाणी माझे मतभेदही नोंदविलेले आहेत. गीतेत कोणतेही सुस्पष्ट तत्त्वज्ञान नाही, गीतेतील भक्तिमार्ग हा समाज जीवनातील राजेशाहीच्या गरजा पूर्ण करणारे धार्मिक तत्त्वज्ञान आहे या मुद्द्यांवर हे मतभेद नाहीत, ते तपशिलाच्या मुद्द्यावर आहेत. कोसंबींची गीतामीमांसा अनेकांना वाजवीपेक्षा तिखट वाटण्याचा संभव आहे. पण त्याला इलाज नाही. धार्मिक तत्त्वज्ञानाने कोणती सामाजिक गरज भागवता आली आहे आणि कुणाची सामाजिक गरज भागवता आली आहे याचे उत्तर भारतीय इतिहासाच्या संदर्भात तिखट वाटण्याचा संभव अधिक आहे. पण