या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


दोन शब्द



 नरहर कुरुंदकर प्रकाशन संस्थेद्वारा प्रकाशित होणारे ' अभिवादन ' हे गुरुवर्य कुरुंदकरांचे चौथे पुस्तक आहे.
 प्रस्तुत पुस्तकात पाच लेख आहेत.
 प्राचीन भारतीय संस्कृतीचा आणि वाङमयाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या सर्वच अभ्यासकांबावत कुरुंदकर गुरुजींच्या मनात नितांत आदरभाव होता. त्यासाठी त्या त्या अभ्यासकांची मते त्यांना पटलेलीच असत असे नाही. विविध चिकित्सा-पद्धतींतून येणाऱ्या निष्कर्षांचा, आवश्यकता भासेल तेथे त्यांनी स्वतःच्या अभ्यासविषयासाठी आणि अभ्यासपद्धतीसाठीही आदरपूर्वक स्वीकार केलेला आहे. त्यामुळे प्रसंगी स्वतःचे निर्णय बदलून घेतानाही त्यांना कधीच संकोच वाटलेला नाही. अशा अभ्यासकांशी त्यांच्या अभ्यासपद्धतीची शिस्त न अव्हेरता आपले मतभेद नोंदवतानाही ते कुठे कचरले नाहीत. विचारक्षेत्रातल्या ह्या निर्भयतेसाठी आणि व्यक्तीबद्दलच्या आदरभावासाठी ते प्रसिद्ध होते. वयाने आणि ज्ञानाने ज्येष्ठ असणान्या अभ्यासकांवर अथवा त्यांच्या लेखनावर आपली प्रतिक्रिया नोंदवतानादेखील त्यांची वृत्ती 'अभिवादन' करण्याचीच होती. हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या ह्या लेखसंग्रहास ' अभिवादन' असे नाव दिले आहे.
 मुक्त-मयूरांची भारते' हा डॉ. नांदापूरकरांचा प्रबंध. ह्या प्रबंधाचा परिचय करून देणारा लेख 'प्रतिष्ठान' ऑगस्ट ५९ च्या अंकात प्रसिद्ध झाला. मध्ययुगीन मराठी वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना हा लेख अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे. ह्या लेखाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ह्या प्रबंधाचे परीक्षण करताना गुरुवर्य कुरुंदकरांच्यासमोर छापील प्रबंधाबरोबरच डॉ. नांदापूरकरांचा टंकलिखित प्रबंधही होता आणि ह्या प्रबंधलेखकाचे आणि गुरुजींचे नाते अत्यंत जवळचे असल्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या चर्चाचाही ह्या लेखाला आधार आहे. ह्या दृष्टीने कुरुंदकर गुरुजींचे हे दुर्मीळ लेखन आहे. ह्या निमित्ताने मराठवाड्यातल्या पहिल्या पिढीच्या एका व्यासंगी अभ्यासकाचे दर्शन आजच्या