या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहाळेकर व रसचर्चा । ५९


दुसऱ्या दिवशी मी कहाळेकरांकडे गेलो आणि त्यांना बोलता बोलता रस म्हणजे काय, या विषयीची माझी भूमिका सांगितली. मला वाटते त्यांनाही हे नांदापूरकरांनी केलेले सुलभीकरण आहे हे माहीत होतेच. कारण ते नांदापूरकरांजवळच शिकलेले होते. पण अण्णांचे नाव न घेता त्यांनी मला विचारले, आता कवितेतील रस तुम्हाला नीट समजलेले आहेत. शेवटी एकदा रस तुम्हाला कळाले हे बरे झाले. आता मला इतकीच शंका आहे की, कवितेतल्या फेकून द्यायच्या साली आणि कोयी कोणत्या आहेत ? मग त्यांनी माझ्यासमोर तांबे यांची एक कविता ठेवली. माझ्या आठवणीप्रमाणे ती कविता त्या वर्षी प्राज्ञ परीक्षेत असलेली ‘पन्नास वर्षांनंतर' ही होती. ते म्हणाले, या कवितेतील साली आणि कोयी जर आपण निवडून काढू शकलो तर सर्वांचीच सोय होईल.
 आपण चर्चा करायची नाही, दुसऱ्याचे ऐकून घ्यायचे नाही, ही कहाळेकरांची पद्धत मला रुचली नाहीच, पण त्यावर इलाज नव्हता. शेवटी एक दिवस मी जोगांचे अभिनवकाव्यप्रकाश हे पुस्तक मिळविले आणि ते मुळापासुन वाचून काढले. सगळेच पुस्तक मला त्या वेळी समजले, असे वाटत नाही. पण रसचर्चेला आरंभ करण्यासाठी माझ्या हातात एक हत्यार सापडलेले होते. त्यातील रसचर्चेचे प्रकरण मी नीट दोनतीन वेळा वाचून काढले. गरज पडली त्याप्रमाणे अण्णांकडून समजावूनही घेतले आणि कहाळेकरांकडे संधी सापडेल त्या वेळेला आपण या ज्ञानाच्या आधारे मुद्दा मांडायचा असा निर्णय मी घेतला. चार-आठ दिवसांनंतर एकदा मी गेलो त्या वेळी कुणाशी तरी ते बोलत होते. त्यांच्या बोलण्यात ध्वनीचा मुद्दा निघाला. काव्याचा आत्मा ध्वनी आहे हे आनंदवर्धनांचे मत आणि काव्याचा आत्मा रमणीय अर्थ आहे, हे जगन्नाथ पंडितांचे मत या दोन मतांतील फरक ते कुणाला तरी समजावून सांगत होते. मी शांतपणे बाजूला बसून राहिलो. समोरची माणसे उठून गेल्यानंतर मी कहाळेकरांना म्हटले, ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे ही भूमिका तुम्हाला रास्त वाटते असे दिसते. खरे म्हणजे ध्वनी हा काव्याचा आत्मा नव्हे, तो काव्याचा विषय नव्हे, ती विषय मांडण्याची पद्धत आहे. कहाळेकर एकदा खळखळून मोकळेपणाने हसले. त्यांनी मला विचारले, तुम्ही चहा घेणार काय? मी म्हटले, घेईन. त्यांनी चहा केला. गुरूने चहा केला, शिष्याने शांतपणे तो स्वीकारला. नंतर कहाळेकर म्हणाले, ध्वनी हा विषय नव्हे, ती पद्धती आहे हे तुमचे मत आपण कबूल करू. पण मला तुम्ही हे सांगा, जो कवितेचा विषय असतो त्याला तुम्ही काव्याचा आत्मा मानायला तयार आहात काय ? मग त्यांनी 'तुतारी' कवितेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, या कवितेत कुणी तरी एकजण कुणाला तरी तुतारी आणून द्या म्हणजे मी अमुक करतो तमुक करतो असे सांगत आहे. तुतारी मागणारा माणूस हा या कवितेचा विषय आहे. हा कवितेचा विपय तुम्हाला मान्य आहे काय? आणि तुतारी मागणारा