या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


६६ । अभिवादन



लोल्लटाची भूमिका प्रामाणिकपणे सांगतो आहे असे आपण का मानावे ? महाराज म्हणत, लोल्लटाचा ग्रंथ उपलब्ध नाही त्यामुळे लोल्लटाच्या नावे सांगितली गेलेली भूमिका इतकीच चर्चा आपण करू शकतो. लोल्लटाची भूमिका व्यवस्थितपणे समजून घेतली गेली आहे, असे त्यांना वाटत नसे. पुढे माझे मित्र एकनाथ महाराज यांनी नवभारत मासिकातून १९७१ साली लोल्लटाची भूमिका तपशिलाने मांडण्याचा प्रयत्न केला. कहाळेकरांना ही मांडणी पुष्कळच समाधानकारक वाटली.
 ते म्हणत, लोल्लटाच्या मते स्थायीभाव पुष्ट होतो हाच रस. स्थायीभावच रसापर्यंत जातो. स्थायीभाव रसापर्यंत जातो अशा अर्थाची वाक्ये भरतनाट्य.शास्त्रातच आहेत. अशा अवस्थेत लोल्लटाची ही भूमिका भरताला अभिप्रेत नव्हती हे सांगता येणे कठीण आहे. पण समजा भरताला हे अभिप्रेत नाही असे जरी मानले तरी रा. श्री. जोग, के. ना. वाटवे, द. के. केळकर, रा. शं. वाळिंबे या मंडळींना लोल्लटाचे खंडन करण्याचा हक्क कसा पोचतो हे समजणे कठीण आहे. कारण ही सर्वच मंडळी रसांची कल्पना स्थायीभावावर आधारतात आणि पुष्ट झालेला स्थायीभाव म्हणजे रस असे मान्य करतात. जोगादी मंडळींना फार तर इतके म्हणता येईल की, लोल्लटाची भूमिका आम्ही अधिक रेखीवपणे मांडतो आहोत. पण हे सगळे लोल्लटाचे अनुयायीच आहेत. मी कहाळेकरांना त्यांच्या विचारातील सूक्ष्म दोष दाखविण्याचा प्रयत्न केला. मी म्हटले, जोग आणि लोल्लट यांच्यात फरक आहे. जोगादी मंडळी ज्या स्थायीभावाचा विचार करीत आहेत तो स्थायीभाव काव्यगत नायकाचा नसून प्रेक्षकांचा स्थायीभाव आहे. कहाळेकर म्हणाले, स्थायीभाव प्रेक्षकाचा मानल्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत तुम्ही लक्षात घेत नाहीत. जर स्थायीभाव प्रेक्षकांचा मानायचा तर मग प्रेक्षकांचा स्थायीभाव उद्दीपित होण्यासाठी सगळा नाटयप्रयोगच विभाव मानावा लागेल आणि मग प्रेक्षकांना स्वत:चे संचारी भाव मिळवावे लागतील आणि नाट्यगृहात अनुभावसुद्धा प्रेक्षकांना दाखवावे लागतील. काव्यगत नायक याचा स्थायीभाव नाट्यप्रयोगातच असणारे विभाव, अनुभाव आणि संचारीभाव एका बाजूला गृहीत धरावे लागतील. या सर्वांशी एकत्रितरीत्या प्रेक्षक समरस होतो, या प्रेक्षकाच्या समरस होण्याला तुम्ही रस म्हणू शकता, पण जो स्थायीभाव विभाव, अनुभावांनी पुष्ट व्हायचा आहे तो स्थायीभाव काव्यगत नायकाचा मानणे भाग आहे. आपण फार तर लोल्लटाची भूमिका अधिक सदोषपणे मांडण्याचे श्रेय जोग आदी मंडळींना देऊ शकू. इतके सांगितल्यानंतर कहाळेकर हसून म्हणत, हेही श्रेय जोग आदी मंडळींना देता येईल, असे वाटत नाही. कारण ही माणसे अभिनवगुप्ताची भूमिका आपल्याला मान्य आहे असे समजून लोल्लटाची भूमिका मांडतात. त्यांना अभिनवगुप्ताची भूमिका सदोष रीतीने मांडणे याचे श्रेय देणे हे न्यायाला धरून होईल.