या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


७६ । अभिवादन



दाखवून नवीन पाऊस पडेपावेतो दुष्काळाचा परिणाम टाळण्याची योजना आखता आली असती. म्हणून दैनंदिन जीवनातील गरजा काव्याने पूर्ण होत नाहीत; ही गोष्ट उघडच आहे. या अर्थाने जर तुम्ही विचारणार असाल तर लौकिकात भूक व भुकेची तृप्ती यापेक्षा काव्यातील भूक व भुकेची तृप्ती यांचे स्वरूप निराळे आहे. पण मुद्दा यापेक्षा निराळा आहे. आपला काहीही संबंध नसताना लौकिक जीवनात आपण दुसऱ्याच्या भावभावनांशी समरस होऊ शकतो की नाही, असाही एक प्रश्न आहे. भावोत्पत्तीशिवाय भावप्रतीती शक्य आहे असे जर आपण मानणार नसू तर मग समूहजीवन अशक्यच आहे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. एक माणूस दुसऱ्या माणसाशी समरस होऊ शकतो या शक्यतेच्या शिवाय सामाजिक जीवन अशक्य आहे. भावोत्पत्तीशिवाय भावप्रतीती शक्य आहे असे जर आपण मानले तर मग ललितवाङमयात अलौकिक भावभावना असतात असे मानण्याची गरज पडणार नाही. आणि जर भावोत्पत्तीशिवाय भावप्रतीती अशक्यच आहे असे आपण म्हणणार असू तर अलौकिक भावनांची उत्पत्ती ही कल्पना आपण स्वीकारली पाहिजे. थोडा विचार केला तर असे आढळून येईल की, जिथे आपला स्वार्थ गुंतलेला नाही पण मानवजातीचा स्वार्थ गुंतलेला आहे अशा प्रसंगांची अवाङमयीन वर्णने वाचतानाही आपण भावविव्हल होऊन जातो. धर्माच्या नावाखाली इन्क्वीझिशनने युरोपात जो छळ केला त्याची वर्णने वाचताना तर माणूस उदास होतोच, पण रोमच्या साम्राज्याचा हास वाचतानाही माणूस उद्विग्न होतो. म्हणूनच आपल्याला भावोत्पत्तीशिवाय भावप्रतीतीची कल्पना शक्य मानावी लागते. या सूत्रावरच सबंध वाङमयीन चर्चेचा प्रपंच उभारलेला असतो.
 कहाळेकरांबरोबर चर्चा करताना रसव्यवस्थेतले जे मुद्दे उपस्थित झाले त्यांतील काहींचा वरील विवेचनात उल्लेख केलेला आहे. अगदी सरळपणे या चर्चा घडलेल्या नाहीत. त्या नेहमीच वेडीवाकडी वळणे घेत घडलेल्या आहेत. या चर्चेत इतकेच मुद्दे उपस्थित झाले असे म्हणता येणार नाही. सहज आठवलेल्या रसचर्चेतल्या या काही बाबी आहेत. यातले पुष्कळसे मुद्दे मी गरजेनुसार वापरलेले आहेत. कहाळेकरांच्या जवळ नवीन शंका उपस्थित करण्याची, विचारांना चालना देण्याची केवढी अफाट शक्ती होती याचा हा एक ओझरता आलेख आहे. तो वाचताना दोन बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. प्रथम म्हणजे फक्त काव्यशास्त्रावरच ते अशी चर्चा करीत नसत. केक शास्त्रांवर करीत असत. कारण ते चौरस महापंडित होते. दुसरे म्हणजे या बाबी चर्चेच्या ओघात त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यांच्या मनात काही सलग मीमांसा असतीलच. त्या सलग पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या नाहीत. कोणत्याच गोष्टीविषयी विचाराअंती माझे मत असे बनले आहे हे सांगण्याऐवजी समोरच्या माणसाला विचारप्रवृत्त करणे यात त्यांना जास्त रस होता. ते आपल्या विद्यार्थ्यांना किती प्रमाणात चिंतनोत्सुक करू शकले याचे उत्तर कधी तरी या विद्यार्थ्यांच्याच लिखाणातून इतरांना शोधावे लागेल.