या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ८३


वाव नव्हता. तिच्या विरुद्ध आम्ही लढलो. एक दिवस मराठवाड्यातील जनतेने निझामाची बलाढय राजवट कोसळलेली पाहिली. ही निझामी राजवट कोसळताना पाहिल्यानंतर अत्यंत आनंद झाला, हे खरे आहे. पण, पुढे ज्या वेळी संस्थानाचे विभाजन करण्याची वेळ आली, तेव्हा दबत्या आवाजात निरनिराळ्या कुरबुरी सुरू झाल्या. हैद्राबाद संस्थान असेच राहिले, तर काय हरकत आहे, असा एक मुद्दा होता. महाराष्ट्राच्या नादी लागण्यापेक्षा महाविदर्भात जायला काय हरकत आहे, असाही एक मुद्दा होता. हितसंबंधांचा विचार करणान्यांना अपरिचित नवी परिस्थिती नकोच वाटत असते. कारण, नव्या परिस्थितीत आपले काय होईल, याचे उत्तर अनिश्चित असते.
 या काळात मराठवाड्यात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे अढळपणे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी बिनशर्त महाराष्ट्रात सामील होण्याची भूमिका घेतली. या प्रश्नावर स्वामीजींनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावलेली होती. त्यांच्या प्रभावाखाली क्रमाने मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबद्दल एकमुखी झाला. आमच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र म्हणजे केवळ मराठी भाषिक एकत्र येण्याचे स्वप्न साकार होणे नव्हते; आमच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिक एकत्र येण्याचा योगही होता. पण, त्याबरोबरच निझामाच्या रूपाने मोगलांचे जे शेवटचे अवशेष शिल्लक होते, त्या मोगलाईच्या अंतिम अवशेषांची समाप्तीही होती. पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याच्या या भूमिकेविषयी पुरेशी कृतज्ञ जाणीव नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. पण त्याची आम्हाला खंत नाही. इतरांनी कृतज्ञ असावे, म्हणून आमच्या भूमिका नव्हत्या. आम्ही आमच्या मुक्ततेचे स्वप्न साकार करीत होतो.
 चितेची बाब असेल, तर ती ही होती की, विदर्भात संयुक्त महाराष्ट्राचा असा बलशाली पुरस्कर्ता नव्हता. श्री. ब्रिजलाल बियाणी, श्री. कन्नमवार व लोकनायक अणे ही मंडळी आग्रहाने महाविदर्भवादी होती. अणे तर विदर्भाची संस्कृतीसुद्धा महाराष्ट्राहून भिन्न आहे, असे मानणारे होते. संयुक्त महाराष्ट्रवादी नेते जे विदर्भात होते, ते नेहमीच वोटचेपेपणाने वागत आले. त्यांच्या भूमिका या प्रश्नावर आग्रही नव्हत्या. विदर्भात संयुक्त महाराष्ट्राचे महत्त्वाचे आग्रही पुरस्कर्ते माडखोलकर होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे सरचिटणीसपद त्यांना देण्याचे कारणच हे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या जिव्हाळयामुळे माडखोलकर आम्हाला अधिकच आपले राहिले.
 मराठवाड्यातील मराठी साहित्य, मराठवाडा साहित्य परिषद आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न ही ती तीन कारणे आहेत,-ज्यामुळे आम्ही माडखोलकरांचे कर्जदार आहोत. ते आम्हाला आपले मानतात, आम्हीही त्यांना आपले मानतो.