या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ललित साहित्यातील पौराणिकता/५

 व्यक्तींना आपल्या लेखनातून न्याय मिळवून देण्याची भूमिका ही एक कला- बाह्य प्रेरणा असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या पौराणिक वा ऐतिहासिक कृतीत केलेला आहे ते आपल्या लेखनाला एक कलाकृती म्हणून फारसे यश मिळवून देऊ शकले नाहीत; कारण अशा प्रतिज्ञापूर्वक केलेल्या लेखनातील व्यक्तींचे मनोभावविश्व कादंबरीकाराने आखून दिलेले असते. लेखनाला योजनापूर्वक हे घडवायचे असते. त्यामुळे अशा लेखनाला मर्यादा पडतात.
 पुराणात दिलेल्या घटिताचा अर्थ शोधणे-त्यात अधिकच कलात्मकता आहे, हे जाणीवपूर्वक तयार जाणिवेने केलेल्या लेखनातून साधणार नाही. मात्र आग्रहीपणा अकलात्मकतेला कारण होत असला तरी लेखकाचा तो हक्क आपणास नाकारता येणार नाही. प्रत्येकाला प्रतीत झालेले लिहिण्याचे स्वातंत्र्य आहेच. पौराणिक काल- खंडाला पुनरुज्जीवित करणारे आणि व्यक्तित्वाचे अनेक अंगांनी दर्शन घडविणारे हे सारे पौराणिक साहित्यकृतीत हवे एवढी अपेक्षा किमानपक्षी करायला हरकत नाही. स्थल,काल,परिस्थिती, वातावरण, व्यक्ती,घटना व प्रसंग यांच्या आगळेपणाची जाण ऐतिहासिक वा पौराणिक ललित कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंतांनी ठेवाव- याला हवी. त्या वातावरणाला लेखकाने आपले हृदय देऊन रसिक वाचकांच्या हृदयाची पकड घेतली तरच खरे कलावंताचे यश या ऐतिहासिक वा पौराणिक ललित साहित्यकृती निर्माण करणाऱ्यांच्या पदरी पडू शकेल.
सदर्भ :-धार आणि काल : नरहर कुरुंदकर; साहित्यविचार : दि. के. वेडेकर