या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोन

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा 'रस' विचार

 श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या एकूण समीक्षेत रस-विवेचन आगळेच आहे. त्यांनी स्वतः विस्तृत रस-विवेचन केले, पण त्या मूल्यांच्या आधारे कलाकृतीचे मूल्य- मापन केले नाही. कोल्हटकरांनी प्रामुख्याने नाट्यसमीक्षा केली आणि त्यांचा रससिद्धांत नाटक हा कलाप्रकार डोळ्यांपुढे ठेवून जन्मला.
 त्यांच्या 'सौभद्र' व 'प्रेमाभास' (१९१७) या दोन नाटकांच्या परीक्षणात, मराठी वाङमयातील विशेष व त्याचे उगम' (१९०९) या एका महत्त्वपूर्ण लेखात, 'विदर्भ वीणा' या संग्रहास त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत व अन्यत्र अनेक ठिकाणी रससिद्धांत चर्चा आलेली आहे.
 'विभावानुभावव्यभिचारिसंयोगाद्रसनिष्पत्तिः या भरताच्या रससिद्धांतावर पौर्वात्य मीमांसकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. रससिद्धांत हा स्थायीभावावर आधारित असून त्याचा तर कुठेही वरील सूत्रात उल्लेख नाही. तरी भारतीय साहित्यशास्त्रात स्थायीभाव, रसनिष्पत्ती, रसप्रक्रिया, रसास्वाद, कलानंद, रससंख्या इत्यादी विषयांवरील प्रश्न महत्त्वाचे म्हणून सतत चचिले गेले. पण कोल्हटकर आपल्या रस-विवेचनात या प्रश्नांना फारसे महत्त्व देत नाहीत. रस म्हणजे रसिकांच्या मनात नेमके काय घडते, याचेच वर्गीकरण ते करतात. काव्यगत व्यक्तींशी रसिकांचे नाते कोणत्या प्रकारचे असते ? उदा:- दुष्यंत व प्रेक्षक यांचे नाते काय ? हे लक्षात घेण्याचा प्रयत्न ते करतात.
 कोल्हटकरांनी 'व्यावहारिक क्षोभाहून निराळी मनाची स्थिती : सुखकर अनुभव' असे रसाच्या संदर्भात विशेष चिंतनीय विचार प्रतिपादन करून 'या व्यावहारिक क्षोभापेक्षा निराळा व सुखकर अनुभव कल्पनाशक्ती जेव्हा आणून देते' त्याला ते रस म्हणतात.
१. नाट्यशास्त्र ६-१२