या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ललित साहित्यातील पौराणिकता

 फसलेली कृती म्हणून तिचा विचार करावा लागेल, पण कलावंताचे याबाबतीतील स्वातंत्र्य नाकबूल करता येणार नाही. कथेच्या व्यक्तीच्या संदर्भात त्या त्या लेखकाला जाणवणारे सत्य हेच शेवटी त्याचे लेखन असते मग ती कथा पुराण, इतिहास वा वास्तवातील असो. लेखकाची पुराण-प्रचीती आणि अनुभूती अंतिमतः महत्त्वाची आणि मोलाची असते.
 कालिदास, भास या संस्कृत साहित्यिकांनी फार पूर्वीच हे स्वातंत्र्य घेऊन आपल्या कलाकृती सिद्ध केल्या आहेत, सजविलेल्या आहेत. साहित्यात शेवटी माणसा- तले 'माणूसपण' शोधायचे असते, तेच महत्त्वाचे असते. हे माणसाचे माणूसपण शोधणेच कोणत्याही कलाकृतीप्रमाणेच पौराणिक कथा, व्यक्ती यांच्या संबंधीचे चिंतन करून या कलात्मक संगतीचा, माणसामाणसातले शाश्वत चिरंजीव नाते उलगड- विण्याचा, प्रसंग घटनांच्या मधील दुवे कलात्मकतेने सांधण्याचा शोध, कलावंताला लागू शकतो. या दृष्टीने पुराणकथांच्या व्यक्तींच्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन अलीकडे विशेष विकसित झाल्याचे दिसून येईल. पौराणिक सत्याच्या, वास्तवाच्या आणि कलात्मक संगतीच्या निर्मितीसाठी कलावंताने पुराणाचाही कसून अभ्यास करायला पाहिजे, हेही तेवढेच आवश्यक आहे. आनंदवर्धनाने म्हटल्याप्रमाणे इतिवृत्त जे आहे ते कथाभिनयाने सांगता आले पाहिजे, याचा अर्थही हाच आहे. कथाभिनयाला महत्त्व देताना हा साहित्य शास्त्रज्ञ दिसतो, ते रस निर्मितीसाठीच ! शिवाय भरताने आपल्या रससिद्धान्तातही व्यक्तींना आलंबन विभाव आणि वातावरणादी गोष्टींना उद्दीपन विभाव म्हटले आहे. म्हणजे रसनिर्मिती हीच महत्त्वाची ! व्यक्ती आणि वातावरण त्या रसाचे आधार आहेत. या न्यायाने पुराणातील किंवा ऐतिह्य कलाकृतीतील व्यक्ती वातावरणापेक्षा कोणत्या शाश्वत चिरंतन मूल्यांचा, मानवी जीवनाचा माणसाचा शोध ही कलाकृती घेते हाच भाग कोणत्याही साहित्यकृतीच्या संदर्भात महत्त्वाचा मानावा लागेल. कलाकृतीतील प्रत्येक गोष्ट प्रतिभाजनित असते.  माणूस प्राचीन, पुराण, इतिहास, सांप्रत या सर्व काळात तोच आहे. म्हणून कलाकृतीचे आवाहन (appeal) सार्वकालीन असते, ते याच अर्थाने. माणसाच्या व्यवहाराचे, स्वभावाचे, जीवनाचे, अनेक परीचे चित्रण सतत वाङमयात पुनःपुन्हा येत असल्याचे दिसते. त्याच मानवी प्रवृत्तींचा झगडा विविध काळांत होता आणि तो कायम राहाणाराही आहे. या मानवी मनोवृत्तीवर प्रकाश टाकणेच अंतिमतः महत्त्वाचे आहे. याला पौराणिक कलाकृतीही अपवाद कशा असतील ? संस्कृतीशी संबंधीतच कलाव्यवहार आहे आणि अतूट असेच त्याचे संस्कृतीशी नाते आहे, हे पौराणिक साहित्याच्या संदर्भात विशेषत्वाने जाणवते. लेखक हा आपल्या कलाव्यवहाराचा नियंता असतो-प्रजापती असतो. कलात्मक व्यवहाराचा प्रारंभच मुळी सत्यापासून होत असल्यामुळे पौराणिक कलाकृतीत पौराणिक सत्य हे एक ज्ञात सत्य म्हणून महत्त्वाचे असते. इतिहासाच्या बदलत्या संस्कृती, समाजजीवनाच्या चक्रानुसार या