या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी कथा : एक दृष्टिक्षेप / ७५ मनोविकारांचे विविध व परिणामकारक दर्शन, कारुण्याने ओथंबलेल्या जीवनाचे दर्शन त्यांनी घडविले. दिवाकर कृष्णांच्या कथानिर्मितीमागील अनुभूती विशाल होती. बैठक व्यापक होती. चिरंतन स्वरूपाच्या मानवी भावनांवर व भावजीवनांवर भर देण्याचे वळण मराठी कथेत त्यांनीच रूढ केले. त्यांच्या 'महाराणी व इतर कथा 'त मानवी मनाचे प्रभावी दर्शन घडते. १९२० मध्ये आलेल्या लाटेने सर्वच कलाप्रकारात पोकळी निर्माण झाली होती. तिला अपवाद फक्त — कथा '-वाङ्मयप्रकाराचा होता. उलट नेमक्या ह्याच कालखंडात कथा संपन्न व ( लोकप्रिय ) कलात्मक बनली. 4 एका अर्थाने हा सांकेतिक कालखंड मानला जातो. १९२० ते १९३० मध्ये जन्माला आलेले लघुकथा, रूपककथा, लघुतमकथा, नाट्यछटा हे उपवाङमय- प्रकार जन्मापासूनच बुरसटलेले, खुरटलेले, दिसतात आणि दिवाकर कृष्णांचा अपवाद वगळला तर कथेलासुद्धा उथळपणाच आलेला दिसतो. याच वेळी मराठी लेखकांत तंत्राविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले होते. फडक्यांचा कलावाद ( जो मूलत: रंजनवादच आहे) व खांडेकरांचा जीवनवाद ( ज्यात स्वप्नरंजनाच्या प्रवृत्तीला महत्त्व अधिक दिलेले असते ) म्हणजे पर्यायाने ' रंजनवाद' च मराठी कथेत आला. फडक्यांच्याच लेखनावरून 'साहित्य हे साधन आहे, साध्य नव्हे' ही गोष्ट सिद्ध होऊ शकते. चैतन्यपूर्ण, अस्सल, रसरशीत अनुभवावाचून सगळे खटाटोप कसे व्यर्थ आहेत, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रा. ना. सी. फडके ! वाचकांचे लक्ष वेधण्याचे, खेचण्याचे कार्य एक वेळ तंत्राने साध्य होईल, पण वाचकांच्या मनावर कसल्याही प्रकारचा सखोल परिणाम आढळणार नाही. त्यांना कलानंदलाभ होणार नाही. ही जीवनानुभवाची उणीव या तंत्राचा गाजावाजा करणाऱ्यांच्या बाबतीतच प्रकर्षाने जाणवते. अर्थात याही प्रवृत्तीचा मराठी कथा-वाटचालीत हातभार आहे. भावविवशता, विस्कळितपणा, अलंकरणाचा सोस, कलावाच गोष्टींवर भर, तंत्राचे आकर्षण हे सगळे दोष असले तरी जाणीव- पूर्वक आकर्षक, बांधीव, रेखीव असे रूप यामुळे कथेला प्राप्त झाले. १९२९ पासून कथालेखन करीत असलेल्या य. गो. जोशी यांची कामगिरी अनेक दृष्टीने वैशिष्टयपूर्ण आहे. त्यांची कथा एका वेगळ्या अर्थाने सांकेतिक बनली. मात्र तंत्रदृष्ट्या नव्हे. त्यांची या टेक्निकची टर उडविणारी 'ग्यानबा-तुकाराम टेक्निक' ही कथा आहे. आपल्या कथेत य. गो. जोशींनी सुपरिचित अशा मध्यमवर्गीयांवरच आपले लक्ष केंद्रित केले. पांढरपेशा समाजाची यशस्वी चित्रे रेखाटत असतानाच त्यांनी कौटुंबिक जीवनात मूलतः माणुसकी प्रभावी असल्याचे दर्शविले. त्याचबरोबर नवमतवादाचा उथळपणाही उघडकीस आणला.. 'मंत्रावाचून तंत्र म्हणजे प्रेतशृंगारच होय' हे सिद्ध करून दाखविले. मध्यमवर्गीय, कौटुंबिक भावना अत्यंत जिव्हाळयाने चितारण्याची