या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० / अभिव्यक्ती पौराणिक संदर्भ आणि चाफा, पारवा यांसारख्या कवितांचे संदर्भ ओघात आले असले तरी भाषेला उजाळा देणारे ठरले आहेत. एका नव्या जाणिवेने स्वतःच्या सामर्थ्याचा संपूर्ण कस पणाला लावून कथालेखन करणारे प्रा. वर्तक ' मनमोर ' मध्ये धडपडताना दिसतात. त्यांचे अनुभव - विश्व सर्वस्वी नवीन आहे असे नव्हे तर ते नव्याने इथे अर्थपूर्ण करू इच्छितात. करारी आणि परखड स्वभावाच्या, पुरोगामी आजीच्या जीवनकथेपुरतीच ही कथा मर्यादित राहिल्यामुळे अर्थपूर्ण वाटते तर आशयाभिव्यक्तीचे नवे रूप सादर करणारी फेरा ही कथा आहे. 'मनमोर ' च्या या लेखकाकडून कसदार कथांची अपेक्षा यापुढे अधिक वाढली आहे. 'आवर्ता 'च्या ' फे-या 'तच त्यांनी सापडू नये ही सार्थ अपेक्षा !