पान:अमेरिका पथदर्शक.pdf/22

हे पान प्रमाणित केलेले आहे.
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों

त्याचें नांव पालासिंह असें होतें. आपल्या भावापासून पुरेसें पैसे घेऊन माझ्याबरोबर तेा पीनांगला आला. आतां आम्हीं फिरून दोघे झालों. स्टीमर कंपन्या पीनांगपासून सिंगापूरचें १२ डालर भाडे घेतात. इकडे प्रवास करणा-यांनीं सर्व स्टीमरांचे भाड्याचे दर सारखे नसतात, हें लक्षांत ठेवावें. कारण तेच टिकीट चीनी व्यापा-यांनी आम्हांस फक्त ४॥ डालरला दिले. म्हणून चांगली विचारपूस करून टिकट घेत असावें.
 असो. ठरलेल्या दिवशीं आम्ही सिंगापूरला जावयास निघालों. ह्या स्टीमरवर चीनी लोकांची अतिशय गर्दी होती. त्यांच्या लांब लांब शेंडया व घाणेरडे कपडे पाहून इतर उतारूंस त्यांची किळस येई. खाण्याच्या बाबतीत तर कांही विचारूंच नका. ईश्वरांनी निर्माण केलेला कोणताही प्राणी खाण्यास हे लोक कमी करीत नाहीत. कीडे, मुंगळे, बेडूक, झुरळें, कुत्रें, मांजरी वगैरे सर्व प्राणी ते गट्ट करून टाकतात. ह्या प्राण्यांना ते इतके सडवून सडवून खातात कीं, पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे येतात. आम्ही चार दिवस भयंकर हालअपेष्टांत काढलें. कारण ह्यावेळीं आम्ही डेकवरीलच प्रवाशी होतों. आमच्याबरोबर इतरही हिंदी मनुष्य होते, त्यांसही फार कष्ट सोसावे लागलें. खरोखर ही एक प्रकारची नरक-यात्राच आहे. माझे सर्व प्रवाशांना असें सांगणें आहे कीं, त्यांनी शक्य तोंवर इंग्रजी कंपन्यापासून अलिप्त असावें. जर्मन व जपानी आगबोटी इतक्या वाईट नसतात. ह्या आगबोटींतून डेकच्या प्रवाशांची देखील चांगली सोय होते.
 सिंगापूरला आमची आगबोट पोहोंचली. बोटीतून उतरून आम्हीं गुरुद्वाराच्या ठिकाणीं गेलों, परंतु तेथें शेजारींच एक हिंदी गृहस्थ आपल्या कुटुंबासह राहत असतात, असें आम्हास कळलें. म्हणून त्यांच्याकडे जाणें आम्हांस इष्ट वाटलें. त्यांच्याकडे गेल्यापासून आम्हांस फार आनंद झाला. त्यांनीं मोठ्या प्रेमानें आमचे स्वागत केलें व आम्हांस रहावयास जागा दिली. एक आठवडा आम्ही त्यांच्याकडे राहिलों; व नंतर हांगकांगला जाण्याची तयारी केली.
 येथें मला आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. ह्या हिंदी गृहस्थांनीं कित्येक हिंदी गृहस्थांकडून मला मदत मिळवून देण्याच्या कामांत पुष्कळ खटपट करून पाहिली. तेथें मी दोनतीन व्याख्यानेंही दिली. ती लोकांना फार आवडली.येथें लांबच्या प्रवासांत उपयोगीं पडणा-या लहान लहान वस्तू मी खरेदी केल्या.