पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/23

हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थान त्यांना मिळाले आहे. नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष असताना त्या वेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी नियोजन मंडळाची 'विदूषकांची टोळी' म्हणून अवहेलना केली होती. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने डॉ. मनमोहन सिंगांना प्रश्न विचारला, 'जी धोरणे दोषास्पद म्हणून आता आपण बदलावयास निघाला आहात, त्यांच्या घडवण्यातही आपला हात होताच, हे कसे?' सिंगसाहेब म्हणाले, "शासनाने त्यावेळी माझे ऐकले नाही, याबद्दल मी माझ्या आत्मचरित्रात सविस्तरपणे लिहिणार आहे."
 ज्या शासनाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही, त्या शासनातून तटकन उठून बाहेर निघण्याची हिंमत दाखवणाऱ्यांतले डॉ. मनमोहन सिंग नव्हेत, हे उघड आहे. आजही त्याच कारणाकरिता नेहरू-इंदिरा-राजीव वारसाची धोरणे उलथवताना त्यांना त्या धोरणांच्या कर्त्यांची भलावण करीतच पुढे जावे लागत आहे. अंदाजपत्रकाचे भाषण घ्या की उद्योगधोरणाचा मसुदा घ्या, मधून मधून पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सुपुत्र राजीव गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळायची आणि नंतर त्यांनी घालून दिलेली धोरणे जमीनदोस्त करायच्या कामास लागायचे अशी काहीशी शैली त्यांना अवलंबावी लागत आहे. भारत म्हणजे काही रशिया नाही! रशियात आज गोर्बाचेव्ह-समाजवाद अपुरा पडला, मार्क्सवाद एकांगी आहे आणि कामगारवर्गाखेरीज इतर वर्गांचेही समाजात महत्त्वाचे स्थान आहे, असे मूर्तिभंजनाचे काम करीत आहेत. भारतात हे शक्य नाही. आकाश कोसळून पडले, तरी नेहरू घराण्यातील श्वानावरही टीका करणे आम्ही अयोग्य समजतो! त्यात नव्या पंतप्रधानांचे बूड स्थिर नाही. '१०, जनपथ'मधील ताईसाहेबांची मर्जी फिरली, तर उद्या त्यांच्या दरवाजाबाहेर उभे राहणेही कठीण होईल अशीच स्थिती. तेव्हा जमेल ते करावे; पण तोंडात शब्द मात्र नेहरूस्तवनाचेच असावेत असे व्यावहारिक धोरण अर्थमंत्र्यांनी स्वीकारले आहे, हे उघड आहे.

 शेक्सपिअरच्या ज्यूलियस सीझर या नाटकात सीझरचा खून होतो. खुन्यांच्या हाती राज्य जाते. सीझरच्या दफनाच्या वेळी त्याचा मित्र मार्क अँटनी भाषण करण्याकरिता उठतो आणि मारेकऱ्यांतील प्रमुख ब्रूटस् या नावाचा सेनापती, त्याच्या विरुद्ध उघडपणे तर बोलता येत नाही; म्हणून दर पाचदहा वाक्यांनंतर 'ब्रूटस् मोठा आदरणीय आहे,' असे वाक्य घोळवीत त्याने ब्रूटसविरुद्ध लोकांना चेतवले. डॉ. मनमोहन सिंग मार्क अँटनीची शैली जाणूनबुजून वापरत असावेत असे वाटत नाही. मार्क अँटनीची भूमिका बजावायलाही मोठे धैर्य लागते.

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / २४