हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुवर्णाला एकदम मनावरचं दडपण उठल्यासारखं वाटलं. गेले कित्येक महिने ती ज्याची वाट पहात होती तो घटस्फोटाचा दाखला तिच्या हातात पडला होता. शेवटी आठ वर्षांनंतर तिची त्या नको असलेल्या नात्यातून कायदेशीर सुटका झाली होती.
 तिचं लग्न ती जेमतेम सतरा वर्षांची असताना झालं. ती एसेस्सी पास झालेली होती. घरी अतिशय हलाखीची परिस्थिती होती. ती सगळ्यात धाकटी. वडील ती लहान असतानाच गेले. थोरले दोघे भाऊ होते, त्यांना चांगल्या नोकऱ्या होत्या पण ते काही मदत करीत नव्हते. थोडीशी जमीन होती तिच्यावर आई आणि ती दोघींचं कसंबसं पोट निघत असे. पुष्कळदा दोन वेळा पोटभर जेवण मिळण्याचीही भ्रांत. तेव्हा आलेल्या स्थळाबद्दल फार चौकशी करण्याची शक्यता नव्हती. त्यातून स्थळ म्हटलं तर माहितीतलंच. नवरा मुलगा सुवर्णाच्या थोरल्या वहिनीचा भाऊ होता. खातंपितं घर होतं. त्यांचा मोठा वाडा होता, मालकीचं एक लॉज होतं, कोळशाचा व्यापार होता. तसं वरवर पहाता स्थळात खोड काढायला जागा नव्हतीच.
 लग्न झालं आणि सुवर्णा सासरी गेली ती निव्वळ मोलकरणीचं आयुष्य जगायला. सासरघरचं मोठं खटलं होतं. कुटुंबातली बारा-तेरा माणसं, पुन्हा बाहेरचे गडी अशा सगळ्यांसाठी दोन वेळचा स्वैपाक करायचा. पुन्हा ही फुकटची मोलकरीण मिळाली म्हणून भांडीधुण्यासाठी असलेली बाई काढून टाकली. म्हणजे तेही काम हिच्यावर. दुसरं कोणी तिला मदत करीत नसे. पहाटे पाचपासून रात्री बारापर्यंत नुसतं राबायचं. तेही अर्धपोटी. इतर कुणी नाश्ता केला तरच हिनं करायचा. पण सहसा बाकी कुणी करीत नसे. जेवणसुद्धा सगळ्यांचं झाल्यावर उरलंसुरलं असेल ते. बऱ्याच दिवसांनी तिला कळलं की बाकीची माणसं बाहेरून हॉटेलातून काहीतरी मागवून बाहेरच्या बाहेरच खायची. हिला आत कळतही नसे आणि तिला कुणी काही देत नसे.

 तसं कामाला ती नाही म्हणत नव्हती पण हे असं तिन्ही त्रिकाळ नुसतं राबायचंच? लग्न झाल्यावर तिला पुढे शिकवू असं सासरच्यांनी तिच्या आईला कबूल केलं होतं. पण लग्न झाल्यापासून त्याचा उच्चारही कुणी केला नाही. तरीही तिनं तक्रार केली नाही पण इतक्या सगळ्या कामाच्या बदल्यात फुकाचा एक गोड शब्दही मिळू नये ह्याचं तिला वाईट वाटायचं. इतरांकडून

॥अर्धुक॥
॥४६॥