हे पान प्रमाणित केलेले आहे.

काय तिला वाईट वागवलं होतं का हाकलून दिलं होतं? ती आपल्या पायांनी घर सोडून आली. आमची तिच्याबद्दल काही तक्रार नाही. ती परत आली तर आम्ही तिला नांदवायला तयार आहोत. मग ती घटस्फोटाची भाषा कशासाठी करतेय?"
 "हे पहा, इथे कोणी कुणाला दोष देण्याचा प्रश्न नाही. ती आपणहून निघून आली की तुम्ही तिला हाकलून दिली हाही मुद्दा गैरलागू आहे. सत्य एवढंच आहे की गेली ७-८ वर्ष सुवर्णाचा आणि तिच्या नवऱ्याचा संबंधही आलेला नाही. ती त्याच्यापासून संपूर्ण दुरावलेली आहे. त्याच्याबरोबर पुन्हा संसार मांडणं तिच्याच्याने होणार नाही. तिच्या दृष्टीनं तिचं लग्न मोडलेलंच आहे. फक्त त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब करून तिला हवं आहे. तो कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करू शकेल. परंतु कुटुंब न्यायालयात परस्परसंमतीने घटस्फोट हा सगळ्यात सरळ आणि सोपा मार्ग आहे. ती कोणत्याही स्वरूपात पोटगी वगैरे मागत नाहीये. तेव्हा एवढं तिच्यासाठी तुम्ही करावं असं मला वाटतं."
 सुदैवाने थोड्याफार चर्चेनंतर सासरा तयार झाला. खरं म्हणजे नवऱ्याला बोलावण्याची गरजच नव्हती. तो सदैव बापाच्या ओंजळीने पाणी पीत असल्यामुळे स्वत:च्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय तो बापावरच सोपवीत होता. सुवर्णाने एकदा नवऱ्याकडे पाहून घेतलं. तो नेहमीप्रमाणे निर्विकार होता. लग्न झाल्यापासून एकदाही त्याने तिच्याबद्दल काही आस्था, माया दाखवली नव्हती. तिला आठवलं एकदा तो रात्रभर तिच्या शेजारी झोपूनही तिला १०२ डिग्री ताप आहे हे त्याला समजलं नव्हतं. त्याच्यापासून आपण कायदेशीर फारकत घेत आहोत ह्याचा तिला यत्किंचितही पश्चात्ताप होत नव्हता. नवरा-बायकोचं काय, कसलंच नातं त्यांच्यात कधी निर्माण झालं नव्हतं.

 सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण होऊन तिला घटस्फोट मिळाला तेव्हा तिनं आणि प्रसादनं रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊन आपला आनंद साजरा केला. ती म्हणाली, "आता आपण लग्न कधी करायचं?" "घाई काय आहे? मला नोकरी तर लागू दे." तो नोकरी शोधण्याचा फारसा गंभीरपणे प्रयत्न करीत नव्हता. एकदा ती त्याला म्हणाली, "मला नोकरी आहे की. आपल्या दोघांच्यापुरतं मी मिळवते. आपण लग्न तर करू. मग तुला नोकरी मिळेल तेव्हा मिळेल." त्यावर तो नक्की असं काही बोलला नाही. विचार करताना

॥अर्धुक॥
॥४९॥