या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ग्रंथकर्त्याची प्रस्तावना

 तळघरात मोहरांचे हांडे भरलेले असावेत, परंतु त्यांवर बसलेल्या कृष्णसर्पाच्या भीतीने त्यांचे जवळ जाण्याससुद्धां कोणाची छाति होऊं नये, आणि अशा स्थितीत आमच्या पूर्वजांनी आमचेसाठी खूप द्रव्य संचय करून ठेविला आहे, म्हणून कोरड्या गप्पा मारूनच स्वतःच्या मनाचे समाधान करून घेण्याचा प्रसंग यावा, तशी तूर्त आपल्या लोकांची स्थिति झाली आहे. भारतवर्षीय ऐतिहासिक भांडार कांहीं सामान्य नाही; परंतु त्यावर कालरूपी कृष्णसर्प आपल्या प्रचंड देहाचे आवरण घालून बसल्यामुळे, आणि त्याला तेथून हुसकावून लावण्याप्त ज्ञानउद्योग, आणि खरा अभिमान या तीन अवश्य लागणाच्या साधनांचा आमचे ठायीं अभाव असल्यामुळे, परकीय मांत्रिकांची कांस धरल्यावांचून आमचें धन आह्मांस लाभेनासे झाले आहे. आमच्या एतद्देशीय लोकांतच असे महामांत्रिक उत्पन्न होतील तो सुदिन म्टहला पाहिजे.

 असो. प्रस्तुत चरित्राचा विषय म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासांतला मूळचा एक अत्यंत उज्वल तथापि कालगतीनें विस्मृतींत पडून राहिलेला भाग आहे. सर विल्यम् हंटर साहेबांनीं हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांची मालिका काढण्याचा विचार केला, तेव्हांच त्या मालिकेंतलें दुसरें पुष्प 'अशोक' हें प्रो० ऱ्हीस डेव्हिड्स यांचे हातून गुंफवून ते इंग्रजी वाचकांस अर्पण करणार होते, आणि तो योग जुळून आला असता, तर माझे श्रम वांचून हल्लींच्यापेक्षां अनंतपटीनें उत्कृष्ट चरित्रग्रंथ भाषांतर रूपानें कां होईना, पण मराठी वाचकांचे हाती पडला असता. पण दुर्दैवाने इंटर साहेबांस कांहीं कारणामुळे ते विचार रहित करावा लागला,