पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अहल्याबाई आणि तुकोजी होळकर.

[९५ ]


कूर्मदृष्टीचे हे फल मिळाले. सुभेदार हरएक गोष्टीविषयी आपले भरंवशावर निश्चित होते. प्रसंगी सुभेदारांच्या आशीर्वादांचाअनुषंग पाहून मला माणूस केले. तेव्हां माझे सुभेदार व मातुश्री प्रत्यक्ष आपणच आहांत. साक्षात् मार्तड येऊन सांगू लागला तरी या पायांशी अंतर होणार नाही मग प्राण जावो की राहो." तुकोजीच्या मुखांतले हे आज्ञाधारकपणाचे शब्द निघालेले ऐकून हा असा प्रकार पुनः न होऊ देण्याविषयी निःसंशय जपेल अशी बाईची खातरी झाली, तरी 'बोलण्यात अर्थ नाहीं, दिसण्यांत येईल तें खरें. बोलण्याप्रमाणे चालणे झाले असतां ईश्वर उपेक्षा करीत नाही.' असें अर्थभरित उद्गार तिने काढिले. खरोखरच तुकोजीने पुनः असा प्रकार करून अहल्याबाईचे मन कधी दुखविले नाही.

 तुकोजी होळकर यास जरी अहल्याबाईने सर्व राज्याचे आधिपत्य दिले होते, तरी वास्तविक राज्यांची खरी मालकीण अहल्याबाई हीच होती; आणि राज्यांतील सर्व लोक व तसेच होळकरांच्या दरबाराशी व्यवहार ठेवणारे परकीय राजे तिलाच मुख्य समजत, व कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणे तो तिजबरोबरच करीत. तथापि यामुळे तुकोजीस कधी वाईट वाटले नाही व त्यास दिलेल्या अधिकारापेक्षा अधिक अधिकाराची त्याने कधी इच्छाही केली नाही. तिने आपल्या सर्व सैन्याची व्यवस्था त्याजकडे दिली होती ती तो उत्तम प्रकारे ठेवून तिच्या आज्ञेप्रमाणे होळकरांस खंडणी देणारे जे अनेक राजे रजवाडे असत त्यांच्याकडून खंडणी वसूल करून ती तिजकडे पाठवीत असे. त्यांत कधीही अफरातफर त्याच्याकडून झाली