पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/135

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२८]
भाग बारावा.


असल्यामुळे ही साध्वी स्त्री आपल्या राज्यांतील प्रजेंप्रमाणे व देवस्थाना प्रमाणे दुसऱ्याच्या राज्यांतील प्रजेविषयीं व देवस्थानांविषयीं ज्याअर्थी इतकी काळजी घेते त्याअर्थी तिच्याठायीं आपपरभाव नाही असा त्यांचा ग्रह झाला असावा. व तो तसा होणें कांहीं वावगें नाही.

 तुकोजी होळकर दक्षिणेत गेल्यापासून पुढे वीस वर्षांचा काल लोटेपर्यंत अहल्याबाईसाहेबांनी केवळ आपल्या बुद्धिसामर्थ्याने होळकरांचा राज्यशकट सुरळीतपणे हाकिला व आपल्या कारकीर्दीत प्रजेस न्याय आणि दया यांचे पूर्ण सुख अनुभवायास लाविले. त्यांची राज्यपद्धति कशी सरळ रीतीचीव सुखावह होती हें मागेंच सांगितले आहे. त्या प्रकारचेच त्यांचे आपल्या बरोबरीच्या परकीय राजांशीही सरळ वर्तन आमरण होते. त्यांचा अधिकार होता तोपर्यंत होळकरांच्या स्वातंत्र्याचा नाश करण्यास परकीय राजांतून कोणालाही धैर्य झाले नाही इतकें सांगितले असता त्यांनी आपल्या प्रजेस कसे संतुष्ट राखिल होते, व आपल्या सासऱ्याचे सामर्थ्य कसे कायम ठेविले होते याची कल्पना सहज करितां येईल. श्रीमंत पेशव्याशी मल्हाररावांचे जे सेव्यसेवकपणाचे नाते होते तें त्यांनीही ठेविले होते. दुसऱ्या राजांच्या नादी लागून तें झुगारून देण्याचा विचार त्यांच्या मनांत कधी आला नाही. त्यांच्या एकनिष्ठ स्वामिभक्तीविषयी एवढे एकच उदाहरण दिलें ह्मणजे पुरे आहे की, श्रीमंत दादासाहेब यांस त्यांच्या कारभाऱ्यांनी त्यांनी ब्रम्हहत्या करून मिळविलेल्या पेशवाईच्या गादीवरून पदच्यूत केल्यावर ते मदतीची भिक्षा मागत मागत बाईसाहेबांपाशी आले; तेव्हां त्यांनी त्यांस असें चोख उत्तर