पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/161

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १५४ ]
भाग पंधरावा.


दुःखांनी त्यांची सर्व शक्ति क्षीण झाली होती. तेव्हां आतां आपणास परलोकास जाण्याची तयारी केलीच पाहिजे असे त्यांस खचित वाटले असावे असे आह्मांस वाटते. तेव्हापासून त्या नित्य उपोषण करीत व त्रिकाळ स्नान करून पार्थिवपूजा करीत. तसेच विशेष महत्वाच्या कारणावांचून कोणाची भेट वगैरे न घेतां एकांतांत बसून हाती जपमाला घेऊन रामनामाचा जप करीत. दुपारी व सायंकाळी पुराण श्रवण करून देवदर्शन घेत व सदा आनंदित वृत्ति ठेवून एकाद्या विरक्त साधूप्रमाणे कालक्रमण करीत. कोणाशी कांहीं बोलावया झाले तर ऐहिक व्यवहारसंबंधाने मुळीच भाषण न करिता परमार्थपर भाषण करीत.

 बाईसाहेबांचे औदार्य तर या वेळी परमावधीस जाऊन पोचले होते. त्या जातीने जरी नित्य उपोषण कर रहात होत्या. तरी नित्य हजारों ब्राह्मणांस पंचपक्वान्नांचे भोजन दक्षिणा देऊन तृप्त करीत असत, व शेंकडों दंपत्यांस मूल्यवान वस्त्रे व अलंकार अर्पून संतुष्ट करीत असत. ब्राह्मणाप्रमाणेच इतर सर्व जातींच्या लोकांसही त्यांच्या येथे मुक्तद्वार असल्यामुळे एकाद्या क्षेत्राच्या ठिकाणी जशी यात्रा भरावी तशी महेश्वरास ठिक ठिकाणचे लोक येऊन त्यांची गर्दी होऊन राहिली होती. तशांत आणखी बाईसाहेबांनी सर्व ऐहिक व्यवहार सोडिले म्हणून त्यांच्या समाचाराकरितां त्यांच्या पदरचे व त्याच्या सलोख्याने वागणारे इतर राजे जे आपल्या परिवारानिशी महेश्वरी त्यांस भेटावयास येत असत त्यांचे ठिकठिकाणी तळ पडून त्या योगाने त्या शहरास विलक्षण शोभा आली होती. बाईसाहे-