पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२८]
भाग तिसरा.


 निमंत्रण केलेले सर्व लोक आले; पण या समारंभास आपले धनी श्रीमंत शाहू छत्रपति आले नाहीत व त्यांच्यावांचून केलेल्या समारंभाची पूर्तता व्हावयाची नाही असे सुभेदारांना वाटून ते स्वतः साताऱ्यास गेले व महाराजांस लग्नास येण्याविषयी त्यांनी विनंति केली.

 आपल्या गादीचा एकनिष्ठ सेवक असून राज्याची वृद्धि करण्याकरितां ज्याने अनेकविध संकटें भोगिली त्या मल्हाररावाची विनंति छत्रपतींस कशी अमान्य होणार ? ते त्याच्या हेतूप्रमाणे लागलेच सपरिवार पुण्यास येऊन दाखल झाले.

 यानंतर ठरलेल्या लग्नतिथीला खंडेराव आणि अहल्या यांचा विवाह मोठ्या थाटाने झाला. आनंदराव जरी गरीब होता, तरी त्याने रीतीप्रमाणे सर्व शिष्ठाचार करण्यास कमी केले नाही. आणखी असे सांगतात की, त्या आनंदाच्या भरात त्याने आपले सर्वस्व ब्राह्मणांस दान केले !! मल्हाररावांच्या पुत्राचे लग्न असल्यामुळे ठिकठिकाणाहून पुष्कळ विद्वान् ब्राह्मण आले होते, त्या सर्वांस त्यांनी योग्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले.

 लग्नसमारंभास जे राजेरजवाडे व मल्हाररावांचे नातेवाईक जमले होते, त्या सर्वांनी त्यांना आपापल्या ऐश्वर्याप्रमाणे व ऐपतीप्रमाणे अहेर केले. अहल्येचा चेहरा विधात्याने असा कांहीं बनविला होता की, त्याकडे पाहतांच बघणाराच्या मनांत तिजविषयीं कन्यावात्सल्य उत्पन्न व्हावें ! सर्व राजेरजवाड्यांनी मोठमोठे दागिने तिच्या अंगावर घातले. मग अहल्येचा-अथवा आतां तिला नुसतें