हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही हे वास्तव स्वीकारलं आणि मग एकामागून एक श्रीमंत बकरे शोधून त्यांची मैत्रीण म्हणून मिरवता मिरवता बरीच पुंजी गोळा केली.
 शेवटी जी गोष्ट घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ती घडली.अ‍ॅलिसनं रुस्तुमवर जाळं टाकलं. रुस्तुमनं तिच्यात काय पाहिलं ते मला कधीच कळलं नाही. त्याच्याइतका सुशिक्षित, सुसंस्कृत माणूस शोधून सापडणं कठीण. तो उत्तम कवी आणि कलाकार होता. त्याच्या मित्रांच्या वर्तुळात प्रसिद्ध लेखक, शास्त्रज्ञ, उद्योजक अशी माणसं होती. अशा माझ्या रुस्तुमने आपल्यापेक्षा वीस वर्षांनी लहान, अत्यंत सामान्य अ‍ॅलिसशी लग्न करावं हे जगातलं एक आश्चर्यच मानलं पाहिजे. पण पुरुष मूर्ख असतात. कितीही बुद्धिमान असले तरी एखाद्या सुंदर मुलीनं त्यांच्यावर भाळल्याचं नाटक केलं की विरघळून जातात.अ‍ॅलिसनं नाटक तर छान वठवलं.
 आधी आधी रुस्तुम तिला वरच्यावर जेवायला वगैरे बोलवायला लागला तेव्हा मी एकदा म्हटलं, "तिला कशाला तू बोलावतोस सारखा सारखा ?"
 "तिनं काय घोडं मारलंय तुझं? बिचारी एकटी आहे इथं, म्हणून बोलावतो."
 "अरे, पण तुम्हा कुणाला ऐकण्यात रस वाटेल असं एक

वाक्य तरी बोलू शकते का ती ? अशिक्षित अडाणी आहे अगदी."
 रुस्तुम हसला. "तू अडाणी म्हणतेस, मी साधी सरळ म्हणतो. प्रत्येकानं साहित्य-कला-विज्ञान ह्यांच्याबद्दल विद्वत्तेचं प्रदर्शन करीत बोललं पाहिजे असं कुठंय ? मला बदल म्हणून तिचं साधं रोखठोक बोलणं आवडतं. उगाच आपल्यापाशी नाही त्याचं सोंग नाही आणीत ती."
 खरं म्हणजे ह्या त्याच्या बोलण्यावरनंच मला धोका कळायला हवा होता, पण मी आंधळी बनले होते कारण रुस्तुम तिच्यात गुंतण्याची यत्किंचितही शक्यता मला वाटली नव्हती. वाटायला

फ्रेनी - ५