या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झालं तर परस्पर भागवीत असावी. पण एकदा तिचं नशीब फिरलं. तिच्यावर पैसे चढत गेले. बरेच पैसे चढल्यावर तिनं मुकाट्याने ते देऊन टाकून खेळ सोडून द्यायचा, पण खऱ्या जुगाऱ्याला हे कधी जमत नाही. कधी ना कधी आपलं नशीब पालटेल आणि आपण मोठं घबाड जिंकू अशा दुर्दम्य आशेनं ती खेळत राहिली. शेवटी सगळं उघडकीला आलं, तेव्हा त्यांच्यावर आकाश कोसळलं. डिपॉझिट, शेअर्स वगैरेंमधील गुंतवणूक होती ती कर्जाने गिळूनच टाकली. ह्यावेळी ॲलिसनं तिचे स्वतःचे पैसे काही थोडे होते ते आणि सगळे दागिने देऊन घरदार विकण्याची किंवा गहाण टाकण्याची पाळी येऊ दिली नाही. शिवाय आता पोटाचा प्रश्न आला. ज्याच्याबरोबर तिच नाव एकेकाळी जोडलं जायचं अशा एकाने तिला आपल्या ऑफिसात टायपिस्ट सेक्रेटरीची नोकरी दिली. बरीच वर्षं ह्या तिघा बसून खायची सवय असलेल्या माणसांचा संसार ॲलिसने आपल्या हिमतीवर चालवला. त्याबद्दल फ्रेनीने कौतुकाचा शब्द कधी काढला नाहीच, उलट एवढं मात्र म्हणाली, "ही नोकरी ॲलिसला कशाच्या बदल्यात मिळाली हे कळायला काही फारशा कल्पनाशक्तीची गरज नाही."
 तर आता त्यांचं चांगलं चाललं असताना ॲलिसने आपल्या हौसेखातर पैसे खर्च केले तर फ्रेनीला त्याबद्दल कटकट करायचं काही कारण नव्हतं आणि ॲलिसच्या उधळपट्टीबद्दल तोंड वाजवणारी फ्रेनी आपल्या आईच्या उधळपट्टीबद्दल चकार शब्दही काढीत नसे. म्हातारीला खरेदीची फार हौस. कधीही बाहेर गेली की, एखादा सुंदर सँडल्सचा जोड, रेशमी स्कार्फ, लहानसा दागिना असं काहीतरी घेतल्याशिवाय परतायची नाही. चांगलं-चुंगलं खाण्याचा पण तिला नाद होता. तिचा रोज दुपारचा चहा, महागात महाग मिठाई नि पेस्ट्रीज खाल्ल्याशिवाय होत नसे. ह्याबद्दल ॲलिसची प्रतिक्रिया नमुनेदार होती. "माझी सासू म्हणजे एक ग्रेट बाई आहे. तिला जगण्यातली मजा कशी चाखायची हे छान कळलंय." असं

२४ - ॲलिस