या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "तो मला डिगी म्हणतो. माझ्या घरचे सगळे मला कटाक्षाने दिग्विजय म्हणतात."
 ती हसतहसत म्हणाली, "मग फिटंफाट झाली तर."
 ह्यानंतर आमची बऱ्यापैकी मैत्री जमली. तरीसुद्धा तिच्यात त्यानं काय एवढं पाहिलं हे मला कळलं नाही. सुंदर होती म्हणावं तर नाकीडोळी तिच्यापेक्षा नीटस बायका मी पुष्कळ पाहिल्या होत्या. ती बोलण्यात पटाईत होती. काही लोकांच्यात हजरजबाबीपणा असतो. त्याचा हुशारीशी तसा काही संबंध नसतो. तिच्या बाबतीतही हे नुसतं संभाषणकौशल्य होतं. तिच्या बोलण्यात काही विशेष लक्ष देऊन ऐकण्यारखं, विचार करण्यासारखं असे असं नाही, पण तरी तिच्याशी गप्पा मारायला मजा यायची. ती कुणाचा शब्द खाली पडू द्यायची नाही, म्हणून तिच्याशी संभाषण हे एक आव्हान असे. कधीकधी तिला न्याहाळताना माझ्या मनात यायचं, ह्या रंगवलेल्या चेहऱ्याच्या, चटपटीत बोलण्याच्या मागे काही हाती लागण्यासारखं आहे का, की जे रूसीला गवसलंय ?
 एक मात्र मला कबूल करावं लागलं. ॲलिसचं रूप, वाक्चातुर्य पुरुषांच्या सहवासात जास्त खुलत असे, आणि त्यांच्या नजरेतलं कौतुक, क्वचित आसक्ती सुद्धा टिपून त्याने ती खूष होत असे, तरी रूसी सोडून दुसऱ्या कुणा पुरुषाला ती शारीरिक जवळीक करू देत नसे. मी एकदा सहज तिच्या कमरेभोवती बाहू लपेटला तर तिने मला सरळसरळ न झिडकारता खुबीने पण ठामपणे आपली सुटका करून घेतली. माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न बघून ती म्हणाली, "मला त्या वाटेनं जायचं नाहीये डिगी."
 "पण मी तुला कुठल्या वाटेनं वगैरे नेत नव्हतो."
 तिनं नुसतंच माझ्याकडे पाहिलं आणि पुसटसं स्मित केलं. माझ्या विधानावर अविश्वास दाखवायचा होता की, सहज स्पर्शातून सुद्धा तोल ढळू शकतो म्हणून त्यापासून दूरच रहायचं तिनं ठरवलं होतं कुणास ठाऊक आणि तोल ढळण्याची भीती असली तर तो तिचा की माझा हेही मला कळलं नाही. एवढं मात्र झालं की,

दिग्विजय - ४९