या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीही वाटत नाही. ना प्रेम, ना मैत्री. माझ्या आयुष्यात तुला थारा नाही. हे सत्य फक्त मी तुला सांगतेय. कशा तऱ्हेनं सांगू म्हणजे तुला पटेल ?"
 त्यानंतर मी फक्त त्याच्या मृत्यूची बातमी वाचली. वर्तमानपत्रात मृत्यूची बातमी येण्याइतपत नाव त्यानं मिळवलं होतं. त्याच्यासाठी माझ्या डोळ्यांत काही पाणी आलं नाही. त्याच्या रूपाने, व्यक्तिमत्त्वाने मोहून गेलेली मी आणि आजची मी वेगवेगळ्याच आहोत. आजही त्याच्या प्रेमात पडणं हा एक मूर्खपणा होता असं मला वाटत नाही. पण त्यावेळी मला रुस्तुम जसा वाटला तसा नव्हता एवढं मात्र खरं. तो उत्तम दर्जाचा चित्रकार नव्हता, कधीच होऊ शकला नसता. तो अष्टपैलू होता पण त्याचा कुठलाच पैलू अगदी लखलखीत, त्याला शिखरावर नेऊन पोचवायला समर्थ असा नव्हता. तो एका आपमतलबी आणि जहांबाज बायकोचा नवरा नव्हता. आमचं नातं ॲलिसखातर तोडल्या-तोडल्या तो मला भेटला असता आणि नंतर ॲलिसची शोधक नजर आपला वेध घेऊ शकणार नाही असं वाटल्यावर मग येऊन भेटला नसता, तर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्याविषयीची हळुवार आठवण मी बाळगली असती.
 त्यानंतर ॲलिस मला एकदा योगायोगानं जहांगीर आर्ट गॅलरीत भेटली. आम्ही दोघींनी एकमेकींना लगेच ओळखलं. तिनं हसून हॅलो म्हटलं आणि माझी प्रतिक्रिया काय असावी ह्याचा निर्णय चटकन न झाल्यामुळे मी म्हटलं, "हॅलो, तू इथं ?"
 ती मोठ्याने हसली. "मला जवळच्या ऑफिसात कुणालातरी भेटायचंय. तो तासाभराने येणाराय म्हणून वेळ घालवायला इथ आले. बरं झालं तू भेटलीस. मला एकदा भेटायचं होतं तुला."
 मी भुवया खूप उंच चढवल्या पण त्याकडे दुर्लक्ष करून ती म्हणाली, "चल, कॉफी घ्यायला येतेस?"
 कॉफी पिता-पिता तिनं विचारलं, "लग्न झालंय ना तुझं?"
 "हो !"

६० - ॲलिस