पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/110

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न - सर, हे झालं गतकाळाबद्दल. पण भविष्यकाळात पण तुम्ही वेगवेगळी म्युझियम करणार आहात, करत आहात त्याबद्दल सांगाल का?

उत्तर - शिरोड्याला आम्ही वि. स. खांडेकरांचं आणखी एक म्युझियम बनवत आहोत. तिथे शिरोड्यातील १८ वर्षांचा खांडेकरांचा काळ, कार्य आम्ही मूर्त करणार आहोत. खांडेकर आणि कोकण' असं त्या म्युझियमचं सूत्र असणार आहे. कोकण हा विषय का पुढे आला ते मी तुम्हाला सांगतो. कोकणामध्ये आजही प्रचंड दारिद्रय आहे, रेल्वे आली तरी. कोकणात अजून प्रचंड अंधश्रद्धा आहेत. कोकणात अजून शिक्षणाचा व्हावा तितका प्रसार झालेला नाही. सन १९२० च्या दरम्यान वि. स. खांडेकरांसारखा एक ध्येयवादी शिक्षक सावंतवाडी ते शिरोडा हे अंतर दर आठवड्याला पायी चालून जाऊन शिकवायचं काम करायचा. नुसतं ते शिकवायचं काम नाही करायचे. अज्ञान, दारिद्रय, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून प्रयत्न करायचे. मुलांच्या पोटात पेज तरी पडावी म्हणून धडपडायचे. साधारणपणे शंभर वर्षापूर्वी एक शिक्षक संवेदनशीलपणे विचार करतो. मग शिरोड्यासारख्या आडवळणी गावी ट्युटोरियल हायस्कूलसारखी शाळा उभारते. आज शंभर वर्षांनी मी जेव्हा त्या शाळेकडे पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्याकाळचा ध्येयवाद, जो त्या काळात शिक्षकांमध्ये होता तो आज राहिलेला नाही. एके काळी शिक्षकांबद्दल समाज जीवनात किती प्रचंड विश्वास होता. या वस्तुसंग्रहालयात आम्ही ट्युटोरियल हायस्कूलचे शिक्षकांचे मस्टर लावलेले

आहे. त्याकाळात विश्वास ही गोष्ट किती प्रचंड होती. हेडमास्तर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांची हजेरी भरत. शिक्षक मस्टरवर सही करत नसत. हेडमास्तरांवर विश्वास. तो ‘ए’ मांडेल नाही तर 'पी'. अॅबसेंट, प्रेझेंट मुख्याध्यापक मांडायचे. एका सामाजिक संस्थेच्या प्रमुखावरच्या विश्वासावरचे हे प्रतीक! आता आपण थम इंप्रेशन घेणारी बायोमेट्रिक यंत्र, मशिन्स लावलीत. त्यातही लांड्या लबाड्या करणारे शिक्षक, कर्मचारी आपणास भेटतात. समाज जीवनातील सर्वात मोठा पहारा, पारदर्शिता स्वतःची, स्वआचरण महत्त्वाचे. माणसाने स्वतःवरचा पहारा सोडला. डिजिटल एजमधील पारदर्शितेचा अभाव पाहिला की माझ्या लक्षात येते की समृद्धी साधनांनी येत नाही, समृद्धी येते ती साध्याने नि विश्वासाने. साध्य हीच साधना. तीच गोष्ट मोठी. आज आपण साधनांमागे । लागलोत. सन २०१६ मध्ये मागे वळून पाहताना आपण गतकालातील आदर्शाचा पुनर्विचार केला पाहिजे, मूल्यांचा विचार केला पाहिजे. ती जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही जाणीव वस्तुसंग्रहालये निर्माण करतात.

आकाश संवाद/१०९