पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/127

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून प्रयत्न व्हायला हवेत. ते प्रयत्न शाळांनीच केले पाहिजे. कारण वाचन संस्कार तिथे होतो. मला चांगले आठवते की मी इयत्ता ११वीला असताना आम्हाला इंग्रजीची दोन पाठ्यपुस्तके होती. एक होते रिडर नि दुसरे होते रॅपिड रिडर. रॅपिड रिडरची कल्पना अशी की विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकाचे स्थूल वाचन करावं. त्यावर प्रश्नही स्थूलच असत. फक्त पाहिले जायचे की तुम्ही ते वाचलय का? कांदबरीचा नायक कोण? कांदबरीची कथा कोणत्या देशाची आहे? असे जुजबी प्रश्न विचारून तुम्ही ते वाचले का हे पाहिले जायचं. इयत्ता ५ वीपासून स्थूल वाचनार्थ आपण पुस्तक देऊ लागू तर वाचनाचा छंद नव्या पिढीस जडेल. हा प्रयोग मराठी, हिंदी, इंग्रजी असा गैभाषिकही करता येईल. आपण जी भाषा सूत्र अभ्यासक्रमात स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने हे करता येणे शक्य आहे. एकविसावे शतक बहुभाषी आहे. एककाळ असा होता की लोक मानत की इंग्रजी ज्ञानभाषा आहे. असं आता काही राहिलेले नाही.

प्रश्न - पण सर, दुसरा एक महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो तो असा की तुमच्या पिढीपर्यंत खूप चांगल्या साहित्य कृती लोकांच्यापर्यंत आल्या. खेदाने म्हणावे लागते की तेवढ्या ताकतीच्या साहित्य कृती या दशकात पाहायला मिळत नाही. याबाबत तुमचं मत काय?

उत्तर - मला नाही असं वाटत. मला अजूनही असे वाटतं की मराठीत सकस लिहिलं जातं, हिंदी, बंगालीत सकस लिहिले जाते. नाही तर असं पहा की साहित्य आकादमीचे पुरस्कारच जाहीर करता आले नसते. साहित्य अकादमीचे जे पुरस्कार जाहीर होतात ते मान्य, अभिजात, सकस कृतीशिवाय जाहिरच होत नाहीत. साहित्य अकादमीच्या आजवरच्या निकालावरून तुम्ही नुसती नजर फिरवली तरी तुमच्या लक्षात येईल की एखाद्या भाषेत सकस कृती नसेल तर त्यावर्षी त्या भाषेला तो पुरस्कार दिला जात नाही.

प्रश्न - मग हे साहित्य सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं काय अपेक्षित आहे?

उत्तर - लक्षात असं येतं माझ्या की आपला चोखंदळपणा वाढला पाहिजे. शासनानी अलीकडच्या काळात ग्रंथालयांना अनुवाद बंद करायचा सपाटा

आकाश संवाद/१२६