पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिवशी लोक दिवे लावतात. आश्विन वद्य त्रयोदशी दिवशी जे लोक दीपदान करतात त्यांना अपमृत्यू येत नाही अशी पारंपरिक कल्पना आहे. हा दिवस खरं तर दुस-यासाठी मागण्याचा, काही करण्याचा दिवस होय.
 दुसरा दिवस ‘नरक चतुर्दशी' म्हणून साजरा केला जातो. आश्विन वद्य चतुर्दशी दिवशी भगवान श्रीकृष्णाने जुलमी नरकासुराचा वध केला. नरकासुराने बंदी केलेल्या सोळा सहस्त्र कन्यांना श्रीकृष्णाने मुक्त केले ते याच दिवशी. या दिवशी जो मंगल स्नान करील त्याला नरक पीडा होणार नाही असा वर कृष्णाने नरकासुरास दिला होता. म्हणून लोक या दिवशी पहाटे मंगल स्नान करून नरकापासून मुक्तीची कामना करतात.
 दिवाळीच्या तिस-या दिवशी अमावस्या' असते. या दिवशी नंतर आश्विन संपून कार्तिक महिना सुरू होतो. मोठा दिवस सुरू होतो तो याच दिवसानंतर, जीवनाच्या उज्ज्वल पर्वाची पहाट या दिवसापासून होते. म्हणून लोक ‘लक्ष्मीपूजन' करतात. या दिवशी दौत, वही पुजून काही लोक ‘सरस्वतीपूजन ही करतात.
 चौथा दिवस दिवाळी पाडवा' म्हणून ओळखला जातो. यास ‘बलिप्रतिपदा ही म्हणतात. विष्णूने वामनावतार घेऊन बळीला पाताळात धाडले तो हा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रमी संवत्सर सुरू होते. बळीराजाने देवांना वेठीला धरले होते म्हणून विष्णूने त्याची हत्या केली, पण तो प्रजाहितदक्ष व दानशूर राजा होता. 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' अशी लोक या दिवशी प्रार्थना करतात.
 दीपावलीचा पाचवा दिवस ‘भाऊबीजेचा' असतो. खरे तर हा स्वतंत्र सण आहे. दिवाळीस जोडून येतो म्हणून तो दिवाळीचाच एक भाग झाला आहे.

 ही कालची दिवाळी आपल्या प्रत्येक सणामागे घटना, प्रसंग आणि कथांची परंपरा आहे. आपला कोणताच सण निरुद्देश्य नाही. भारत हा ‘संस्कृती संकर' देश आहे. या देशात अनेक लोक आले. आर्य, अनार्य, हूण, कुशाण, डच, फ्रेंच, पोर्तुगाल, मोगल, तुर्क, पठाण अशा अनेक जाती, धर्म, पंथ, देशांचे लोक आपल्या देशात आले. काहींनी इथे संस्कृती विकसित केली. काहींनी साम्राज्य विस्तार केला. काही धर्म प्रसारासाठी आले. काहींनी व्यापार केला. या सर्व आघातात आपण आपल्या धर्म, संस्कृती आणि सणांची परंपरा अखंड ठेवली. सणांच्या अखंडित परंपरेमागे केवळ धर्म, जात, संस्कृतीचा अभिमान नाही. खरे तर आपला प्रत्येक सण हा तर संस्कार आहे. दिवाळीच्या

आकाश संवाद/४१