पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/6

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाज संवादी आकाशभाषिते

 सन १९६0 सालचा तो काळ असेल. मी कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये शिकत होतो. तिथला आमचा सारा परिपाठ हा रेडिओ टाइम' असायचा. म्हणजे रेडिओवर सकाळी सिग्नेचर ट्यून सुरू झाली की आम्ही उठायचो. सकाळी सातच्या बातम्यापर्यंत मुखमार्जन, प्रातर्विधी, स्नान इ. आटोपून आम्ही कवायत, प्रार्थनेसाठी जमत असू. आठच्या बातम्या लागल्या की आम्हास अभ्यासास बसावे लागे. दहाचा कार्यक्रम संपला की भोजन. अकरा वाजता शाहू मिलचा भोंगा होत असे. मग आम्ही शाळेस जात असू. सायंकाळी शाळेतून आलो की सहावाजता बातम्या सुरू झाल्या की आमची सायंप्रार्थना, हजेरी इ. चाले. सातच्या प्रादेशिक बातम्या व त्यानंतरचे बाजारभाव ऐकत आमचे सायंभोजन होत असे. रात्री आठच्या बातम्यांना अभ्यासास बसावे लागे ते रात्री दहाची गाणी लागेपर्यंत. मध्ये बुधवार एक तासाचा अपवाद असायचा. बिनाका गीतमालेचा अमीन सयानीचा आवाज एक गारूड होतं. शिवाय ‘पहिले पायदान का गीत' त्याची ओढ, पैज, चर्चा सारे चालायचे. तो काळच असा होता की सा-या समाजाचे घड्याळ रेडिओ होते.
 रेडिओचे कार्यक्रम, भक्तिगीतं, देशभक्तीपर गीते, मुलाखती, भाषणे, कृषी वार्ता, महिला जगत, रजनीगंधा, शास्त्रीय संगीत, वाद्यांची जुगलबंदी, राष्ट्रीय चर्चा, बातम्या, विविध भारती, बेला के फूल, लोकसंगीत, श्रुतिका, युववाणी या सर्वांनी पिढ्या घडवण्याचं काम केले. दूरदर्शन आले, वाहिन्या आल्या तरी माझ्या कानांशी जडलेली रेडिओची मैत्री अजून दूर झालेली नाही. असे का व्हावे? एक तर हा श्रवण संस्काराचा अभाव असावा. मी पाळण्यात