पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/62

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आज जगाच्या जवळजवळ सगळ्या विद्यापीठांमध्ये हिंदीचा अभ्यास, शिक्षण तसेच संशोधन होऊ लागले आहे. जगाच्या अनेक देशांतील आकाशवाणी व दूरदर्शनाच्या प्रसारणात भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी कार्यक्रमांचे प्रक्षेपण होऊ लागलं आहे. मॉरिशस, त्रिनिदाद, सुरीनाम, फिजी इ. देशांनी हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले आहे. जपान, रशिया, झेकोस्लोव्हाकिया, क्यूबा, नेपाळ, चीन इ. देशात हिंदी वृत्तपत्रे, नियतकालिके तसेच पुस्तके इत्यादींचे प्रकाशन होऊ लागले आहे. विश्व हिंदी संमेलनांच्या विराट आयोजनांमुळे हिंदीचं विश्वभाषा रूप स्पष्ट झालं आहे.
 कोणत्याही भाषेचे वैभव दोन प्रकारचे असते. एक भौतिक आणि दुसरं आध्यात्मिक, गेल्या चाळीस वर्षांत निःसंशय हिंदी भाषा भौतिक दृष्टीने संपन्न बनली आहे. आता भविष्यात आपल्याला तिला आध्यात्मिक दृष्टीने संपन्न करावयाचे आहे. आगामी दशकात आपल्याला हे बघायचं आहे की कशा प्रकारे हिंदी आध्यात्मिक दृष्टीने मजबूत होईल, कशा त-हेने ती अधिक लोकांद्वारे स्वीकारली जाईल. हे आपल्या पिढीचे उत्तरदायित्व आहे. हे आपण निभावले पाहिजे. हिंदीच्या आजच्या विकसित रूपामागे आपल्या पूर्वजांची १५०० वर्षांची मेहनत आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रकारच्या वादळी वाच्यातून या नावेला वाचवून आणले आहे. तिला सांभाळणे हे आपलं कर्तव्यच आहे. नाहीतर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

 आपल्याला माहीतच आहे की इतिहास म्हणजे उपदेशांचे भांडार आहे. त्यातून आपण योग्य ते घेतलं पाहिजे. जगातील अनेक देशांचा भाषा इतिहास आपल्यासमोर आहे. जगाच असे अनेक देश आहेत की ज्यांनी राष्ट्रभाषेच्या जोरावर आपल्या देशाला मजबूत आणि समृद्ध बनविले आहे. जपानलाच घ्या. दुस-या महायुद्धानंतर तो देश म्हणजे राखेचा ढीग होता. पण जपानी माणसात राष्ट्राभिमानाचा पाया इतका पक्का आहे की, गेल्या ५० वर्षांत तो देश जगातील सर्वांत शक्तिशाली देश बनला आहे. आज सगळे जग आधुनिक तंत्रज्ञानासाठी जपानच्या तोंडाकडे आऽ वासून बघते आहे. जपानी लोक आपले सारे तंत्रज्ञान जपानीतूनच जगाला देतात. हा आहे त्यांचा राष्ट्राभिमान! जपानच्या सर्व विमानतळांवर लिहलेले असते. आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो, जर तुम्हाला जपानी येत असेल तर." तीच गोष्ट इस्त्रायलची. हा देश आपल्यानंतर स्वतंत्र झाला. जेव्हा तो स्वतंत्र झाला तेव्हा त्याच्याजवळ ना भाषा होती ना लिपी. राष्ट्राभिमानी इस्रायलींनी आपल्या बोलीभाषा ‘हिब्रू'लाच राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले. आज इस्त्रायलचे डॉक्टर, इंजीनियर, तंत्रज्ञ, वैज्ञानिक सगळे हिब्रूतच शिक्षण घेत आहेत. तेथे आधुनिक तंत्रज्ञानासाठी

आकाश संवाद/६१