पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/70

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माधव ज्युलियनांनी मराठीत 'गज्जलांजली'च्या रूपाने आणलेली गझल केवळ रुजलीच नव्हे, तर आजच्या मराठी काव्यातील तो सर्वांत लोकप्रिय काव्यप्रकार म्हणून ओळखला जातो आहे. मंगेश पाडगावकर, सुरेश भटांसारख्या कवी श्रेष्ठांनी या काव्य प्रकारात प्रतिष्ठा दिली. हा काव्य प्रकार ‘रंग माझा वेगळा ‘एल्गार' सारख्या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहामुळे मराठी वाचकांच्या जिभेवर खेळू लागला आहे. 'गझलनामा' सारखी पुस्तके मराठीत येऊ घातली आहेत. मराठी रूबाई व गझल यांचे स्वतंत्र मराठी रूप आज धारण होते आहे हे विसरून चालणार नाही. बहर, काफिया, रदीफ अलामत या सर्व बाबी मराठी गझलमध्ये जशाच्या तशा स्वीकारण्यात आल्या आहेत ही गोष्ट हिंदी उर्दू प्रभावाचीच निदर्शक नव्हे का?

 काव्याप्रमाणेच मराठी कथा, कादंबरी, नाटक, इतिहास, पत्रकारिता या सारख्या गद्य साहित्यावरही हिंदी भाषेचा वेळोवेळी प्रभाव पडत आला आहे. पण हा प्रभाव काव्याइतका स्पष्ट नाही हे मान्य करायला हवे. हिंदी मराठीतील कथा, कादंब-यांचा विकास स्वातंत्र्यपूर्ण काळात एकाच पठडीत झाला असल्याने व दोहोत विषय, समस्या, विचार इत्यादींचे साम्य असल्याने हा विकास समांतर होत राहिल्याचे दिसून येते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी भाषेस लाभलेला राष्ट्रभाषेचा दर्जा व हिंदी चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी या सारख्या व्यापक प्रसार माध्यमांचे लाभलेले वरदान इत्यादींमुळे हिंदी साहित्याचा विकास झपाट्याने झाला. नाटकाचा अपवाद वगळता कथा, कादंबरी, ललित निबंध, शब्दचित्रे, आठवणी, जीवन चरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी साहित्य मराठीपेक्षा प्रभावी बनले आहे. अलीकडे हिंदी साहित्याचा मराठीत होणार वाढता अनुवाद हिंदी भाषेच्या मराठीतील परिणामच सूचित करतो. मोहन राकेश लिखित ‘आधे अधुरे', शंकर शेष लिखित ‘घरौंदा', 'एक और द्रोणाचार्य, ‘खजुराहो का शिल्पी' या नाटकांचे अनुवाद, तसेच प्रेमचंदांची गोदान, यशपालांच्या मनुष्य के रूप व श्रीलाल शुक्लांच्या रागदरबारी या कादंब-यांचे मराठीत झालेले अनुवाद या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहेत. आज हिंदीतील साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, दूरदर्शन इत्यादीसाठी समर्पित असलेली नियतकालिके, हिंदीत मोठ्या प्रमाणात निघतात. मराठीत निघणाच्या वृत्तपत्र व नियतकालिकांतून प्रकाशित होणा-या कला, क्रीडा, चित्रपट इत्यादींवरील समीक्षात्मक लेखांवर हिंदी नियतकालिकांचा असलेला प्रभाव सहज पाहता येण्यासारखा आहे. वरील विषयांना वाहिलेली मराठी नियतकालिके बच्याचदा हिंदी नियकालिकांची मराठी आवृती वाटावी इतकी अनुवादित व अनुकरणीय असतात.

आकाश संवाद/६९