पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/96

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रार्थना

 प्रार्थना ही नैमित्तिक क्रिया होय. ती नियमित करू लागलात की तिला कर्मकांडाचं रूप येतं. मग धार्मिक कर्मकाण्ड नि प्रार्थनेत माझ्या लेखी फरक उरत नाही. प्रार्थना मुळात दुर्बलतेचा उद्गार होय. तिचा जन्म व्यक्तिगत असहाय्यतेतून होतो. तिच्या विकासाची अंतिम परिणती सामुदायिक कल्याण भावना होय. प्रार्थना स्वसंवाद आहे. तिचे प्रकटीकरण सामुदायिक अथवा व्यक्तिगत प्रदर्शनाचा भाग होय. प्रार्थना व्यापक असायला हवी. ती अंतर्मुख करणारी स्वहिताय, तद्वतच परहिताय प्रक्रिया होय. असं झालं तरच ती उपयुक्त क्रिया ठरेल. प्रार्थना अशक्त, पराधीन स्थितीत शोधलेला आंतरिक, मानसिक आधार होय.
 प्रार्थना आधारासाठी करायची. तिच्यामुळे जगण्याचं बळ येतं. मनाचं दौर्बल्य दूर करण्याची तिच्यात शक्ती असते. प्रार्थना खरं तर स्वत:तील आधार शक्तीचा जगण्याच्या, चांगलं जगण्याच्या ऊर्मीतून घेतलेला स्वबळाचा संचय नि शोध होय. प्रार्थनेतून बाह्य बळ मिळतं यावर माझा विश्वास नाही. असा विश्वास ठेवणे म्हणजे एकापरीने भूत, प्रेत, परमेश्वर, दैवसारख्या भ्रामक तत्त्वांवर विश्वास ठेवणेच होय.

 अंतर्मनातील ऊर्मीच्या शोधाची प्रार्थना गद्यमय असते. पद्यमय प्रार्थना म्हणजे अंतर्मनातील रंजक रूप. प्रार्थना दुर्बल सबलाकडे करतो. निरपेक्ष प्रार्थनाही कवी कल्पना आहे. प्रार्थनेस जात, धर्म, पंथ यांचा संबंध जोडणे थोतांड होय. प्रार्थनेचा नि धर्माचा संबंध असतच नाही मुळी. मुळात धर्म ही आचार कल्पना होय. प्रार्थना हा विचार आहे. धर्म प्रार्थनेचं प्रकट रूप होय. निधर्मात प्रार्थना असतच नाही मुळी. निधर्मिता हीच व्यापक विश्वधर्म रूप मानव कल्याणाची अंतिम परिणती होय. ती तशी असायला हवी.

आकाश संवाद/९५