पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/98

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रार्थनेच्या अपेक्षित परिणामांसाठी निवड, चाल, वाद्यमेळ इत्यादीपेक्षा मनोभूमिका, अंतर्मनाचा निश्चय महत्त्वाचा. जीवनविषयांशी प्रार्थनेला जोडून तिचा उद्देश विधायक बनवता येतो. कृती रचनात्मक, सर्जनात्मक बनणे महत्त्वाचे.
 प्रार्थना अर्थ समजून म्हणत राहण्याने मनोभूमिका बनण्यास मदत होते. प्रकट प्रार्थनेचा उपयोग तेवढाच. पण त्यातही हळूहळू कर्मकांड येते व परिणामशून्यता येते. जाणीव करून देणे इतपत प्रार्थना कार्य करू शकेल, पण प्रार्थनेचं समर्थन कर्मकांडाचंच समर्थन होय, हे विसरून चालणार नाही.
 कुटुंबात दैनंदिन जीवनात प्रार्थना स्वीकारणे म्हणजे चोर मार्गाने देवपूजा मानणेच होय. प्रार्थना स्वीकारली की आरत्या, स्तुती, भक्तिगीते कशी वेगळी ठरतात? या साच्यामागे कर्मकांडी मानसिकताच मग काम करू लागेल. पूजा पाठ, प्रार्थना नियमित करणारे नियमित भ्रष्टाचार करत राहतातच हे आपण पाहतो. अंतर्व्यवहार, अंतर्विचार बदलणे म्हणजे वर्तन परिवर्तन, त्यावर भर हवा. उपचारापेक्षा रचना बदलावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.
 संस्कारशील वयात घडण होत असताना प्रार्थना, नमाज, पठण या क्रिया विशेष प्रकारची मनोभूमिका तयार करतात. पण त्याचा सर्वांवर समान परिणाम थोडाच होतो. शाळेत समान संस्कार ग्रहण करणारे विद्यार्थी मग भिन्न व्यवहारी का होतात? वृत्ती विकास म्हणजे शिक्षण. प्रार्थना हे त्याचं साधन होऊ शकेल, पण बाह्य नि प्रासंगिक. चिरंजीवी साध्य वृत्ती विकासच हवं. पूर्व प्राथमिक ते बारावी हे संस्कार वय. त्यात मर्यादित रूपात परिणाम शक्य. वृध्दवस्थेत परत प्रार्थनानुगामी माणसं मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यात उपरती भाव असतो. तो साक्षात्कार नसतो साक्षात्कार, बोध या प्रक्रिया खप्या. त्या स्वशोधातून येतात. स्वशोधाचे शिक्षण प्रशिक्षण, मन्वन्तर घडवून आणायला हवे. प्रार्थना कोणती, कुठे, कशी म्हटली जाते याला फार कमी महत्त्व असतं अशी माझी धारणा.
 प्रार्थनांचा अर्थ उलडून सांगायला हवा. तो सांगण्यावर भर दिला जात नाही. कारण आपलं शिक्षण हे साधन केंद्रित झालय. शिक्षणातील साध्य आपण हरवलंय हे मान्य करायला हवं.

 प्रार्थना ही गद्यमय असते तशी पद्यमय. तिचं खरं रूप गद्यमय असतं. तिचा आशय अध्यापन, अवांतर अध्ययन यांच्याशी जोडला जातोय असे नाही. गेला तर त्याचं महत्त्व संदर्भाचं राहतं. संदर्भ परीक्षा, स्पर्धा, समारंभ, मेळावे, संमेलने सर्वांतच उपयुक्त असतात.

आकाश संवाद/९७