पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्राची अवश्यकता

घेण्यासारखा आहे. डॉ. क्लारा डेव्हिस यांनीं तेरा मुलांवर हा प्रयोग केला. त्यांचें अंगावरचें दूध सुटल्यावर, म्हणजे सहापासून अकरा महिने वयाच्या या मुलांपुढे अनेक प्रकारचे खाण्याचे पदार्थ ठेवले व त्यांपैकी पाहिजे ते आणि पाहिजे तितके त्यांना खाऊं दिले. मात्र हे सर्व साधे पदार्थ होते, म्हणजे कोणताहि पदार्थ मिश्र नव्हता आणि लोणी, साखर वगैरेसारखा कृत्रिम रीतीने तयार केलेला नव्हता. या मुलांचें दररोज वजन करून वेळोवेळी त्यांचें रक्त व लघ्वी तपासलीं, आणि त्यांनीं काय व किती खाल्लें हेंहि लिहून ठेवलें. अशा रीतीने एकंदर २१८०० जेवणांसंबंधी नोंद केली. जेवणाच्या पदार्थात मांस, मासे, अंडीं, नऊ प्रकारच्या भाज्या,पांच प्रकारची धान्यें, सहा प्रकारची फळें, दूध, ताक व मीठ इतके पदार्थ होते. त्यांना दिवसांतून तीनदां अन्न देत. प्रत्येक जेवणांत आठ ते अकरा पदार्थ असत आणि ते ठरलेल्या क्रमानें येत. पदार्थ शिजवलेला असल्यास त्यांत बिलकुल मीठमसाला नसे, आणि पाणी काढलेले नसे. प्रत्येक पदार्थ बारीक करून वेगळ्या बशीत ठेवून, सर्व बशा एका थाळींत ठेवून, ती थाळी मुलांसमोर एका टेबलावर ठेवीत असत. मुलांस हातांनी जेवतां येत असल्यास तीं तसे करीत असत, पण तीं तितकी मोठीं नसल्यास एक दाई जवळ बसत असे, आणि जे पदार्थ घेण्याचा मूल प्रयत्न करील तो त्यास चमच्याने देत असे. परंतु तिनें कोणताही पदार्थ आपण होऊन देतां नये, शिकवण्याचा प्रयत्न करतां नये, आणि मागितलेला पदार्थ दिलाच पाहिजे, असा नियम होता. कोणतीही बशी रिकामी झाल्यास पुनः भरीत, म्हणजे कोणताही पदार्थ पाहिजे तितका खातां येत असे. या प्रयोगावरून पुढील गोष्टी दिसून आल्या. १. मुलांस सर्वांत जास्त आवडणारे पदार्थ म्हणजे मांस, बटाटे, गाजरें, बीट, वाटाणे, सफरचंद, केळीं, संत्री आणि अंडीं हे होत. फारसे कोणालाच आवडत नसत असे पदार्थ म्हणजे स्पिनॅच, लेट्यूस, सलगम आणि जव हे होत. परंतु बाकीचे पदार्थ, म्हणजे अननस, पीच, कोबी, फुलकोबी, ओटचें पीठ, गहूं, दूध, मक्याचें पीठ, हाडांतील मगज, मासे, आणि शरीरांतील पेशी, यांत मात्र बरीच रुचिभिन्नता दिसे. हे बहुतेकांना आवडत व कित्येक वेळीं कांही मुले खूप खात, पण सर्वांनाच आवडत नसत. कांही