पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्राची अवश्यकता

खात नसत. त्यांच्या आवडीनिवडी समजल्यावरही ती अमुक जेवणाला अमुकच खातील असे सांगतां येत नसे. उदाहरणार्थ एक मूल १ पासून ७ अंडी खाईल किंवा मुळीच खाणार नाही, किंवा एक पासून चार केळीं खाईल. दूध दररोज ११ ते ४८ औंस लागत असे. मीठ तोंडांत घातल्यावर तीं तोंड वेडेवांकडें करीत, पण तें कधीही थुंकून टाकले नाही, इतकेंच नव्हे तर तोंड वांकडे करूनही वाटल्यास पुनः घेत असत. त्यांच्या इच्छेच्या लाटा दिसत असत, म्हणजे कांही दिवस धान्य, अंडी, मांस किंवा फळें नियमित प्रमाणांत खाल्ल्यावर कांहीदिवस त्यांना एखादाच पदार्थ खूप खावासा वाटत असे, आणि नंतर तीं पुनः प्रमाणावर येत. या फाजील खाण्यामुळे त्यांना कधी वीटही येत नसे आणि अजीर्णही होत नसे, तेव्हा त्याला फाजील कां म्हणावें ? त्यांना कच्चे किंवा शिजवलेलेच जास्त आवडत असे, असे म्हणतां येणार नाही. गोमांस कच्चेंच आवडत असे, केळीं कचीं, गहूं शिजवलेले, आणि अंडी, गाजरें, व वाटाणे, दोन्ही प्रकारचे सारखेच आवडत. दहाअकरा महिन्यांची मुलें कठिण पदार्थ दुधांत बुडवून मऊ करून खात, पण पदार्थ मिसळून खाण्याचा प्रयत्न दिसला नाही. जेवणाचे वेळीं मधूनमधून पाणी, दूध किंवा संत्र्यांचा रस पीत असत. यापैकी कोणालाही पोटदुखी किंवा मलावरोध झाला नाही.
 वरील प्रयोगावरून हें स्पष्ट दिसतें की पुढे ठेवलेल्या खाद्य पदार्थांतून सहा महिन्यांच्या मुलांना उपजत प्रेरणेने योग्य अन्नाची निवड करतां येते. अर्थात् इतक्या प्रकारचें अन्न लहान मुलांपुढे ठेवणे सर्वच आईबापांना शक्य नसतें, आणि सुमारें नऊ महिनेपर्यंत आईचे दूध हेच मुलांना योग्य अन्न असतें. परंतु नंतर मात्र मुलांवर दुधाचा मारा करण्यांत अर्थ नसतो. मुलांस वाटेल तें अन्न खाऊं देण्यास आईबाप विनाकारण भितात, परंतु त्यांत धोका नसतो.
 वरील प्रयोग इतका सविस्तर देण्याचे कारण हेंच की प्रयोगांनी किंवा आपोआप आलेला अनुभव, हेंच बिनचूक शास्त्रीय ज्ञान मिळवण्याचें खरें साधन आहे, आणि हें ज्यांना माहीत असेल त्यांना वरील प्रयोगाचें महत्त्व समजेल.