पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुष्याचा आहार

परिस्थिति बदलली कीं त्यांचा उपयोग नाही. मनुष्याचे बाबतींत या प्रेरणा अगोदरच कमी तीव्र, आणि त्यांतून मनुष्याने निसर्गाशीं शक्य तितका संबंध तोडला. तो वस्त्रे वापरूं लागला, आणि भलतेंच अन्न खाऊं लागला, तर मग त्याची प्रकृति बिघडेल नाही तर काय होईल ? निसर्गात मांजर केवळ मांस आणि कधीकधी गवताचे मोड, यापेक्षां कांही खात नाही. मनुष्याच्या घरीं तें दूधभात खाऊं लागलें. अशा तऱ्हेने पाळलेले प्राणि आजारी पडतात. आणि त्यांना पशुवैद्यांची गरज लागते यांत नवल काय ? भातासारख्या कृत्रिम अन्नापुढे मांजराची नैसर्गिक प्रेरणा बंद राहते; लहानलहान उडते प्राणि दिव्याच्या उघड्या ज्योतींवर येऊन प्राण देतात. निसर्गात उघड्या ज्योती नसल्यामुळे नैसर्गिक प्रेरणा तेथे काम करीत नाही.
 शाकाहारी व विशेषतः फलाहारी प्राण्यांना मद्यार्काचा वास आवडतो. यामुळे नैसर्गिक स्थितींत अत्यंत हुशारीने आणि सावधगिरीने राहणारे हत्ती किंवा वानर यांसारखे प्राणि दारूवर इतके लुब्ध होतात की ती पुरेशी मिळाली तर ते मरेपर्यंत पितील.'फॉरमॉल्' मधें नऊपट पाणी मिसळून तें एका बशींत ठेवल्यास तेथे माशा येऊन तें पाणी इतकें पितात की त्या विषाने त्यांना उडून जाण्याची देखील शक्ति न राहून त्या तेथेच मरतात. तेव्हा अन्नापैकी पोषक कोणतें व बाधक कोणतें, हें आपणास नैसर्गिक प्रेरणेने समजत नाही यांत नवल काय ? कृत्रिम अन्न खाल्ल्याशिवाय गत्यंतरच नसतें, आणि तेथे नैसर्गिक प्रेरणा नसल्यामुळे जें आपल्या जिभेला आणि नाकाला चांगलें वाटेल तें आपण खातों. परंतु असल्या आकर्षणाचे परिणाम काय होतात हे पाहिलेंच. घरीं बाळगलेले माकड दारू पितें, तंबाखू ओढतें, कोकेन खातें. घरीं ठेवलेले मांजर कच्चे मांस टाकून मसालेदार, भाजलेल्या मांसाकडे वळतें, आणि पोपट कच्या फळांऐवजी काफीत बुडवून पाव खाऊं लागतो. निसर्गात शिजवलेलें अन्न नसतें हें खरें, परंतु एवढ्यावरून कांही निसर्गप्रेमी लोक धान्याचे पीठ कच्चें खातात, तें मात्र चूक आहे, कारण धान्यें हें मनुष्याचें नैसर्गिक अन्न

१३